नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत व भारतीय रेल्वेच्या वन स्टेशन वन प्राडक्ट या योजने अंतर्गत रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेला नाशिकरोड रेल्वे स्थानकात येवल्याची पैठणी विक्रीसाठी स्थान मिळाले असून उद्घाटनापूर्वीच रेल्वे प्रवासी ग्राहकांनी पैठणी खरेदी सुरु केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणल्याने स्थानिक उत्पादनाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली असली तरी केंद्राने देशभरातील रेल्वे स्थानकांपैकी प्रथम यादीत ५३२८ स्टेशनांचा समावेश करण्यात आला होता, परंतू यातील कमी प्रवासी संख्या असलेल्या स्टेशन वर स्टाॅल लावण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने लक्षात आल्यावर ज्या स्थानकांवर रोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते अशा ८०० रेल्वे स्थानकाची यादी नव्याने जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून ही योजना भारतीय बाजारात चीनी वस्तूंना टक्कर देण्यासाठी बनविण्यात आली असून यात खादी ग्रामोद्योग, हातमाग उद्योग, कापड, हस्त उत्पादने, पारंपारिक वस्र, स्थानिक शेती उत्पादने, प्रक्रिया व उपप्रक्रिया केलेले अन्न उत्पादने यांचा समावेश करण्यात आला आहे. रेल्वेच्या वतीने उत्पादक विक्रेती कंपनी, महिला बचतगट किंवा संस्थेला स्टाॅल उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
भुसावळ विभागातील नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा आणि बु-हानपूर या स्थानकांचा समावेश आहे, नाशिकरोडला पैठणी स्टॅालचे उद्घाटन करण्यात आले असून देश विदेशात प्रसिद्ध असलेली पैठणी प्रवाशांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मंदा फड यांनी नाशिकरोड भागात महिलांना स्वंयरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कित्येक वर्षांपासून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महिला बचतगटांच्या माध्यमातून विविध उत्पादने तयार करुन विक्री करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. फड यांच्यामुळे शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. होळी-दिवाळी पासून सर्वच सण उत्सवासाठी बचतगटातील महिलांच्या उत्पादनाला व्यासपीठ मिळवून देत आहेत, या संस्थेच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पैठणी विक्री स्टॉल सुरु होत आहे.आ. उमा खापरे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, हेमंत गायकवाड, महिला शहराध्यक्ष गौरी आडके, रश्मी बेंदळे, संगिता गायकवाड, शिल्पा पारनेरकर, अशोक सातभाई, ज्योती चव्हाणके, सारिका वाघ, सुजाता जोशी, संगिता वाघ, प्रशांत जाधव, नितीन चव्हाणके, पूजा वाघ, सुनील पवार, राजेश पलारिया, अमोल ठाकूर, प्रकाश फड, ऋषिकेश फड आदी उपस्थित होते.
Paithni will now be available at Nashik Road Railway Station….