पैठण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाह समारंभात किरकोळ कारणांवरून वाद किंवा रुसवे फुगवे होतात, परंतु मध्यस्थीने वाद मिटतात. परंतु काही वेळा वाद विकोपाला जातात. तालुक्यातील एका गावात मानपानावरुन लग्नात वधू-वर पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात १०ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पैठण तालुक्यातील थापटी तांडा गावात एक लग्न समारंभात पुण्याहून वऱ्हाड आले होते. विशेष म्हणजे लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून मुलीकडच्या मंडळीकडून चांगली तयारी करण्यात येत होती. त्यानंतर लग्न समारंभ देखील पार पडला. मात्र याचवेळी वधू-वर पक्षांमध्ये मानपानावरुन सुरुवातीला किरकोळ वाद झाला.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न देखील केला. पण पुण्याहून आलेल्या वऱ्हाडातील काही मंडळीनी आक्रमक भूमिका घेतली आणि वाद आणखीनच वाढला. वाद एवढा विकोपाला गेला की, शाब्दिक युद्धानंतर प्रत्यक्ष हाणामारीवर प्रकार आला. त्यानंतर तुफान राडा सुरू झाला. दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर हल्ला चढवत तुंबळ हाणामारी करत होते. यात महिलांना देखील मारहाण करण्यात आली. वधू आणि वर दोन्ही बाजूचे एकमेकांवर भिडले.
या सर्व प्रकारात १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे. मात्र दोन्ही गटातील मंडळीनी पोलिसात तक्रार केलेली नाही. झालेला वाद आपापसात मिटवला असल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र या हाणामारीची परिसरात जोरदार चर्चा आहे. भर उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यामध्ये असा प्रकारे घडल्याने त्यातून आणखी काही बरे वाईट होऊ शकते, त्यामुळे पोलिसांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे.
Paithan Wedding Ceremony Fight Two Groups 12 Injured