दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पेठ महामार्गावर चाचडगाव परिसरात आयशर ट्रक आणि पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून २ गण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत हे चाचडगावचे रहिवासी आहेत. हा अपघात इतका जबरदस्त होता की, पिकप गाडीचा चक्काचूर झाला. रस्त्यावर तिन्ही तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यामुळे चाचडगाव गावावर शोककळा पसरली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिककडून गुजरातकडे आयशर ट्रक (क्रमांक एमएच 15 पीव्ही 8934) जात होती. तर, चाचडगावकडून एक पिकअप (क्रमांक एमएच 15 येजी 937) येत होते. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चाचडगाव येथील संतोष हिरामण लांडे (वय 25), हेमंत रघुनाथ मोरे (वय 26), कमलेश सुखदेव मोरे (वय 27) हे तीन तरुण जागीच ठार झाले. तर लखन भगवान गांगोडे (वय 25), रवींद्र वामन पोटींदे (वय 27) यांना नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी उमराळे बुद्रुक पीआय वाघ, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, हवालदार धनंजय शीलवटे, चाचडगाव पोलीस पाटील पुरुषोत्तम पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी चाचडगाव येथील ग्रामस्थांनी मदत कार्य केले. पुढील तपास दिंडोरी पी आय व कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शीलवटे करीत आहेत.