पेठ – गुजरातमधून महाराष्ट्रात गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पेठ शहराजवळील भारत पेट्रोल पंप येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ३८ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर, १२ लाखांच्या वाहनासह एकूण ५० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस किरण बैरागी, दिलीप रेहरे, अंबादाज जाडर आदींच्या पथकाने पेठ शहरानजिक असलेल्या पेट्रोल पंपासमोर टाटा कंपनीच्या वाहनाची तपासणी केली. वाहन क्रमांक MH-15-CC -2842 मध्ये साड्यांचे बंडल असल्याचे आणि बनावट बील असल्याचे पोलिसांना आढळले. त्यांनी तत्काळ वाहनाची कसून तपासणी केली असता जवळपास ३८ लाख १९ हजार २०० रुपये किंमतीचा विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आली.
याबाबत अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक सुभाष नारायण पालवे (वय ५७, रा. देवराई ता. पाथर्डी जि. अहमदनगर), क्लिनर शिवाजी रामू कराड (वय ४८, रा. अहमदनगर), वाहनमालक विनित गिरीधारीलाल जग्गी (रा. अहमदनगर) या तिघा संशयितांसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.सी. वसावे पुढील तपास करीत आहेत.