नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी 1 मे, 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला आणि अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल सहानुभूती आणि शोकसंवेदना व्यक्त केली. दहशतवादी संघटनांना पाठबळ देण्याचा, प्रशिक्षण आणि निधी पुरवण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांना या संवादात दिली.
“जागतिक दहशतवादाला पोसणारा आणि या प्रदेशात अस्थिरता पसरवणारा एक विध्वंसक देश म्हणून पाकिस्तानचा चेहरा उघड झाला आहे. यापुढे जग दहशतवादाकडे डोळेझाक करू शकत नाही”, असे संरक्षणमंत्री म्हणाले. जागतिक समुदायाने अशा घृणास्पद दहशतवादी कृत्यांचा अतिशय स्पष्टपणे आणि एका सुरात निषेध करणे आणि त्यांना विरोध करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्यात अमेरिकन सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला. अमेरिका भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला समर्थन देतो, असे त्यांनी सांगितले.