नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारत दहशतवादासमोर झुकणार नाही आणि या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही असा सज्जड इशारा केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला.
अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली. ते म्हणाले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख प्रत्येक भारतीयाला जाणवते; हे दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या स्थळाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.शाह यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.