मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
पांढरा शुभ्र कुर्ता आणि धोती परिधान करून आलेल्या १२६ वर्षांच्या गृहस्थांकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. त्यांच्या साध्या राहणीमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नावाची उद्घोषणा होताच ते थेट पंतप्रधानांच्या आसनाकडे गेले आणि जमिनीवर गुडघे टेकवून नतमस्तक झाले. पंतप्रधानांनीही उभे राहून त्यांचा नमस्कार स्वीकारला आणि त्यांनाही नमस्कार केला. राष्ट्रपतींसमोरही ते अशाच प्रकारे नतमस्तक झाले आणि सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. राष्ट्रपती भवनात झालेला पद्म पुरस्कार वितरणाचा संस्मरणीय सोहळा सर्वांनी अक्षरशः डोळ्यात साठवला.
वय १२६, पण तरुणाला लाजवेल इतके तंदुरुस्त असलेले स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवन पद्धती आणि योग यांना प्रोत्साहित करण्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात नतमस्तक झालेल्या स्वामी शिवानंद यांच्याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा आहे. विशेषतः त्यांच्या दीर्घायुष्याच्या सहस्याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. या रहस्याचे उत्तर त्यांनी एकदा एका मुलाखतीत दिले होते.
स्वामी शिवानंद मुलाखतीत म्हणाले होते, की “ते सेक्सपासून दूर राहतात आणि मसाल्यांचे सेवन करत नाही. तसेच दररोज योगासने करणे त्यांच्या आयुष्याचा भाग आहे”. शिवानंद यांच्या पासपोर्टवरील माहितीनुसार, त्यांचा जन्म ८ ऑगस्ट, १८९८ साली झाला होता. १९ व्या शतकाच्या अखेर जन्म झालेल्या शिवानंद यांचा आज २१ व्या शतकाच्या २०२२ मध्ये सन्मान झाला आहे. ते १२६ वर्षांचे असून, त्यांनी तीन शतके पाहिले आहेत. ते आजही अनेत तास योग करतात. खूप गरीब कुटुंबात जन्म झालेल्या शिवानंद यांनी सन्यासाचा मार्ग निवडला होता. त्याशिवाय त्यांनी आपले आयुष्य योग आणि भारतीय जीवन पद्धतीत समर्पित केले आहे.
https://twitter.com/guy_visionary/status/1505893417641189384?s=20&t=y2DmnwK5sWj3wNgxIu7lWQ
एएफपी या वृत्तसंस्थेशी कोलकाता येथे बोलताना ते म्हणाले, की “मी साधेपणाने आणि शिस्तीत माझे आयुष्य जगतो. मी खूप साधे जेवण करतो. यामध्ये फक्त उकडलेल्या भाज्यांचा समावेश असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तेल किंवा मसाले नसतात. डाळ-भात आणि हिरवी मिरची खातो”. ५ फूट आणि २ इंच उंची असलेले शिवानंद एका चटईवर झोपतात. मी दूध आणि फळे खात नाही. लहानपणी अनेकदा मी उपाशी झोपलो आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याच्या दाव्यावर ते म्हणाले होते, की मी कधीच प्रचारावर विश्वास ठेवत नाही. परंतु माझ्या अनुयायांचे म्हणणे होते, की मी हा दावा केला पाहिजे.
स्वामी शिवानंद यांच्या आई-वडिलांचे ते ६ वर्षांचे असताना निधन झाले होते. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना एका अध्यात्मिक गुरूंकडे सोपविले होते. या गुरूंसोबत त्यांनी देशभरात प्रवास केला होता. ते आजही तंदुरुस्त आहेत आणि एकटे रेल्वेने प्रवास करतात. इंग्रजांच्या काळात जन्म झालेल्या शिवानंद यांना आजच्या तंत्रज्ञानाबद्दल काहीच अप्रूप वाटत नाही. त्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यात रस नाही. ते आजही जुन्या पद्धतीने जीवन जगत आहेत. आनंदी जीवन जगण्याला ते महत्त्व देतात. स्वामी शिवानंद सांगतात, “पूर्वी नागरिक कमी वस्तूंसोबत आनंदी राहात होते. आज तेच नागरिक ताणतणावात जगतात, आजारी असतात. माणसामधील प्रामाणिकपणाही लोप पावला आहे. हे पाहून मला खूप दुःख होते. नागरिकांनी आनंदी राहावे, आरोग्यदायी आणि शांततेने जीवन जगावे, असे मला वाटते”.
The best video on internet today ❤? pic.twitter.com/F0SaxnKKjA
— BALA (@erbmjha) March 21, 2022