नाशिक/मुंबई – “योग विद्या घरोघरी” हे ध्येय उराशी बाळगून गेली 65 वर्षे योगक्षेत्रात कार्यरत असलेले योगाचार्य पद्मश्री सदाशिव प्रल्हाद निंबाळकर ह्यांचे आज पहाटे नवी मुंबईत देहावसान झाले. ते 97 वर्षांचे होते. ते आधुनिक काळातील योग-भीष्माचार्य म्हणून ओळखले जात. त्यांनी सर्व स्तरातील लक्षावधींना योग शिकविला आणि हजारो योग शिक्षक प्रशिक्षित केले.
मूळचे अहमदनगर चे रहिवासी असलेले निंबाळकर नोकरी निमित्ताने मुंबईत आले आणि तीच त्यांची कर्मभूमी झाली. सांताक्रूझच्या योग इन्स्टिट्यूट चे पू .योगेंद्रजी, नागपूरचे पू. जनार्दन स्वामी, ठाण्याचे अण्णा व्यवहारे आणि हठयोगी निकम गुरुजी यांच्या मालिकेत निंबाळकर यांचे नाव आदराने घेतले जाते.
मुंबईच्या एका शाळेत शारीरिक शिक्षण अध्यापक म्हणून असलेले निंबाळकर यांचे जीवन आमूलाग्र बदलले ते लोणावळ्याच्या जगप्रसिद्ध कैवल्यधाम चे संस्थापक पूज्य स्वामी कुवलयानंद यांच्या सान्निध्याने. विज्ञानाधिष्ठित आणि शास्त्रीय योगाचे जनक म्हणून स्वामीजी ओळखले जातात. त्यांच्या सान्निध्यात योगाचे मूलभूत शिक्षण घेतल्यानंतर निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी सौ. शकुंतला ताई यांनी दादर ला 1974 मध्ये “योग विद्या निकेतन” या संस्थेची स्थापना केली.
प्रत्येक घरात, कार्यालयामध्ये योग पोहोचविणे, स्वास्थ्य रक्षण आणि व्यक्तिमत्व विकास तसेच प्राचीन योगाला सहजसाध्य करणे यावर निंबाळकर यांचा भर होता. त्याचवेळी आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून त्यांनी लेखन सुरू केले. प्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या आग्रहावरून त्यांनी *आरोग्यासाठी योग* हा ग्रंथ लिहिला आणि आज विविध भाषा मिळून सुमारे 2 लाख प्रती जिज्ञासूपर्यंत पोहोचल्या आहेत. पुढे या तसेच प्राणायामावरील त्यांच्या ग्रंथाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले.
योग विद्या निकेतन चे मुख्य केंद्र 1986 मध्ये नवी मुंबईत स्थापन झाले. याठिकाणी योग विज्ञान, योगोपचार, निसर्गोपचार, मनो-शारीरिक व्याधी आणि योग यावर पदविका अभ्यासक्रम शिकविले जातात. निंबाळकर यांनी देश विदेशातील विविध योग संस्था, विद्यापीठे, योग कॉन्फरन्स मध्ये मार्गदर्शन केले आहे. “हायपरटेन्शन आणि योग” यावरील त्यांच्या संशोधनाला पुरस्कार मिळाला आहे.
योग क्षेत्रातील त्याच्या तपश्चर्येसाठी भारत सरकारने त्यांना 2004 मध्ये “पद्मश्री” बहाल केली. याशिवाय “स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराने” त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांची योगावरील 29 पुस्तके प्रसिध्द आहेत. देशातील प्रमुख शहरे तसेच अमेरिका, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बंगळुरू मधील स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे संस्थापक डॉ एच आर नागेन्द्र ह्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.