इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक प्रतिभावान गायक आणि संगीतकार होऊन गेले. आपल्या प्रतिभेने त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. यातही अनेक गायक, संगीतकार असे आहेत ज्यांनी आपल्या अवीट आणि मधुर गाण्यांनी रसिकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. यातीलच एक म्हणजे सचिन देव (एस.डी.) बर्मन अर्थात सचिनदा.
हिंदी संगीत आणि चित्रपटसृष्टीत अनेक गायक आणि संगीतकारांनी योगदान दिले आहे. सचिनदा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार. आपल्या आवाजासोबतच संगीतानेही त्यांनी आपल्या काळात खूप प्रसिद्धी मिळवली. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही.
एसडी बर्मन यांचा जन्म त्रिपुरातील. त्यांचे मूळचे राजघराणे. सचिनदांचे वडील त्रिपुराचे राजे इशानचंद्र देव बर्मन यांचे दुसरे पुत्र.
तत्कालीन कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर एस.डी. बर्मन यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला. संगीताचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. बर्मन दा यांचे वडील सुप्रसिद्ध सितार वादक आणि धृपद गायकही होते. संगीतातील बारकावे एसडी बर्मन यांनी वडिलांकडून शिकून घेतले. सचिनदा यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते.
मात्र, चित्रपट संगीत हे शास्त्रीय संगीताचे कौशल्य दाखवण्याचे माध्यम नाही, असे त्यांना वाटायचे. तरीही त्यांनी दिलेल्या चित्रपट संगीताला एक त्यांचा असा वेगळा टच जाणवतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सचिनदा कधीच त्यांच्या सुरांची पुनरावृत्ती करत नसत. संगीतप्रेमींमध्ये ते अनेक नावांनी ओळखले जात होते. मुंबईत त्यांना ‘बर्मन दा’ आणि बांगलादेशात ‘शोचिन देब बोरमॉन’, बॉलिवूड संगीतकारांमध्ये ‘बर्मन दा’ आणि चाहत्यांमध्ये एसडी बर्मन तसेच ‘जीन्स’ म्हणून ओळखले जात होते.
१०० हून अधिक चित्रपटांना संगीत देणाऱ्या सचिनदा यांनी १३ बंगाली चित्रपटांत तर हिंदीतील १४ गाणी गायली आहेत. ‘गाईड’ चित्रपटातील ‘वहाँ कौन है तेरा.. मुसाफिर.. जायेगा कहां को’ या गाण्याला जेव्हा त्यांनी संगीत आणि आवाज दिला, तेव्हा ऐकणारे श्रोते देखील थक्क झाले. ‘सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए’ हे त्यांचे गाणे आजही लोकप्रिय आहे. या प्रतिभाशाली संगीतकाराने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. १९५८ मध्ये त्यांनी ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार जिंकला. तर संगीतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी १९६९ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय सचिनदा यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले आहेत.
Padmashri Micic Composer S D Burman Life Journey
Entertainment Bollywood Bangla