इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राष्ट्रपती भवनात आज एक अविस्मरणीय प्रसंग पहायला मिळाला. पद्मश्री पुरस्कारांचे वितरण आज भवनात झाले. यावेळी स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वय सध्या १२५ वर्षे आहे. जेव्हा हा पुरस्कार स्विकारण्यासाठी ते खुर्चीतून उठले तेव्हा ते सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीच्या दिशेने गेले. त्यानंतर त्यांनी जमिनीवर आपले डोके ठेवत पूर्णपणे नतमस्तक होत पंतप्रधानांना नमस्कार केला. त्याचवेळी मोदी यांनीही जमिनीला हात टेकवत स्वामींचा नमस्कार स्विकारत त्यांनाही प्रणाम केला. त्यानंतर स्वामी राष्ट्रपतींच्या दिशेने निघाले त्यावेळीही त्यांनी जमिनीला गुडघे आणि डोके टेकवत नमस्कार केला. आणि जेव्हा राष्ट्रपतींसमोर गेले त्यावेळीही त्यांनी अशाच प्रकारे नमस्कार केला. हा प्रसंग पाहून संपूर्ण हॉल चकित झाला. भारतीय संस्कृती, संस्कार आणि सन्मानाचे अनोखे उदाहरण यानिमित्ताने याचि देही याचि डोळा सर्वांना पहायला मिळाला. सहाजिकच हा व्हिडिओ आणि क्षण सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.
बघा हा अफलातून व्हिडिओ
https://twitter.com/RubikaLiyaquat/status/1505897013711413251?s=20&t=Yn1Udc7u9Ee1IXawIQRUug
स्वामी शिवानंद हे मूळचे वाराणसीचे आहेत. आणि पंतप्रधान मोदी हे सुद्धा वाराणसीचेच प्रतिनिधीत्व करतात. स्वामींचे कार्य योगाच्या क्षेत्रात अतुलनीय आहे. योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. योगामुळेच आज वयाच्या १२५व्या वर्षीही ते अत्यंत निरोगी आणि सुदृढ आरोग्याने जीवन जगत आहेत.