नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेळघाटातील सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागडसारख्या गावात राहून पद्मश्री डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे दांपत्य गेल्या ३९ वर्षांपासून रुग्णसेवा देताहेत. जन्मापासून हृदयाचा गंभीर आजार असतानादेखील केवळ आत्मशक्तीच्या बळावर अवघ्या १ रुपयात रुग्णसेवा देणाऱ्या या दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी महिलादिनी प्रत्यक्ष ऐकण्याची पर्वणी नाशिककरांना मिळणार आहे. रोटरी क्लबच्या गंजमाळ येथील सभागृहात बुधवारी (दि. ८) संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
वर्षानुवर्षे सामाजिक सेवेचा वसा घेतलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने विविध स्तरांवर समाजाच्या विकासाचे उपक्रम राबविले जातात. यावेळी आदिवासी, अतिदुर्गम, डोंगराळ अशा मेळघाटातील सातपुडा पर्वताच्या डोंगररांगांतील घनदाट अरण्याने व्यापलेल्या ठिकाणी बैरागडसारख्या तीन नद्यांच्या त्रिकोणात असलेल्या बेटात राहून, तिथल्या लोकांसाठी आपले आयुष्य वेचणार्या डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या असामान्य संघर्षाचा जीवन प्रवास ऐकण्याची पर्वणी नाशिककरांना मिळणार आहे.
सातपुड्याच्या जेमतेम दोन-चार हजार वस्तीच्या गावात डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी १९८४ पासून आरोग्यसेवा कशी सुरु केली, अडचणींचा सामना कसा केला, बैरागड आणि परिसरात लोकांचे परिवर्तन कसे केले, आरोग्यासोबतच कृषी, सामाजिक आणि शैक्षणिक प्रबोधन कसे केले, कुपोषण कसे कमी केले, घरातून कोणताही पाठिंबा आणि आधार नसताना, अशा प्रकारच्या सामाजिक कामांची कोणतीच पूर्वपरंपरा नसताना आणि जन्मापासून हृदयाचा गंभीर आजार असताना केवळ आत्मशक्तीच्या बळावर हे काम कसे उभे केले, आरोग्य सेवेसाठी मेळघाटातील बैरागडचीच केलेली निवड का केली यासारख्या अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारी डॉ. कोल्हे दाम्पत्याची प्रकट मुलाखत यावेळी घेण्यात येणार आहे. रोटरी क्लबचे जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि माजी अध्यक्षा मुग्धा लेले हे त्यांची मुलाखत घेणार आहेत.
डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांचा जीवन प्रवास उलगडविणारी मुलाखत ऐकण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रोटरीचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया सचिव ओमप्रकाश रावत, कार्यक्रम समितीच्या प्रमुख शिल्पा पारख, मंथ डायरेक्टर सुचेता महादेवकर, मंथ लीडर वंदना सम्मनवार आणि हेतल गाला आदींनी केले आहे.
Padmashree Dr Ravindra and Smita Kolhe Nashik Visit