पुदुच्चेरी – प्रसिध्द उडिया आणि इंग्रजी साहित्यिक, विचारवंत, शिक्षणतज्ञ आणि योगी श्री अरविंद ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. मनोज दास यांचे मंगळवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी गतवर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले होते.
गेली ६० वर्षे ते श्री अरविंद आश्रमात वास्तव्याला होते. उडिया आणि इंग्रजी भाषेत त्यांची सुमारे ७५ पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झाले आहेत. साहित्य क्षेत्रातील लघुकथा, कादंबरी, निबंध, काव्य आणि प्रबंध लेखन असे प्रकार त्यांनी हाताळले आणि उडिया भाषेत स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. अ टायगर अँड ट्वायलाईट, द सबमर्ज व्हॅली, द ब्रिज इन द मूनलिट नाईट, सायक्लान्स, मिस्टरी ऑफ मिसिंग कॅप, मिथस्, लिजेन्टस् या त्यांच्या काही प्रसिध्द कृती होत.
साधी पण परिणामकारक शैली, ग्रामीण भागातील दुःख वेदना, परस्पर संबंध, रुढी, नैसर्गिक आपत्ती आणि माणूस यांचे दर्शन त्यांच्या साहित्यातून घडते. लेखक, संपादक, स्तंभलेखक तसेच संशोधन क्षेत्रात त्यांची लेखणी लीलया विहार करीत होती. त्यांच्या या योगदानाबद्दल ओरिसा साहित्य अकादमी, केंद्र साहित्य अकादमी, सरला पुरस्कार, साहित्य भारती पुरस्कार, सरस्वती सम्मान, वेदव्यास सम्मान पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
मार्क्सवाद ते अध्यात्म
प्रो. मनोज दास हे शालेय जीवनात एक बंडखोर विद्यार्थी नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्यावर मार्क्सवादाचा पगडा होता. विद्यार्थी चळवळीत त्यांनी तुरुंगवासही भोगला. काही काळ महाविद्यालयात अध्यापन केल्यानंतर ते १९६३ साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि येथेच स्थायिक झाले. आश्रमाच्या ‘श्रीऑरोविंदो इंटरनेशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ मध्ये त्यांनी अनेक वर्षे इंग्रजी आणि तत्त्वज्ञान या विषयांचे अध्यापन केले. श्रीअरविंद ह्यांच्या पूर्णयोग तत्त्वज्ञानाचे एक ज्येष्ठ अभ्यासक, साधक आणि लेखक म्हणून ते ओळखले जात. १९०० ते १९१० या स्वातंत्र्य लढ्यातील कालखंडात श्रीअरविंद ह्यांचे योगदान यावर अभ्यास करण्यासाठी ते लंडन आणि एडिनबर्ग येथे गेले होते. तेथे मूळ कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांनी अनेक अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकणारा ग्रंथ लिहिला. तो उडिया, बंगाली आण इंग्रजीत प्रसिद्ध आहे.
उडिया भाषेतील एक सव्यसाची लेखक, श्रीअरविंदांच्या तत्त्वज्ञानाचे मर्मज्ञ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक आपल्यातून गेले, अशा शब्दात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.