नवी दिल्ली – १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाचा ५० वा वर्धापनदिन सध्या भारतात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या तावडीतून बांगलादेशाला मुक्त करण्याच्या कामगिरीत नायक ठरलेले बांगलादेशचे नागरिक कर्नल काझी सज्जाद अली जहीर यांना २०२१ सालच्या पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल (सेवानिवृत्त) जहीर हे ७१ वर्षांचे झाले आहेत. ते २० वर्षांचे असताना पाकिस्तानच्या विविध योजनांचे कागदपत्रे आणि नकाशे घेऊन भारतात आले होते.
पाक लष्कराच्या अत्याचारामुळे देश सोडला
लष्करात भरती झाल्यानंतर कर्नल सज्जाद अली जहीर यांची नियुक्ती आर्टिलरी कोर (तोफखाना) मध्ये झाली होती. त्या वेळी पूर्व पाकिस्तानात (आजचा बांगलादेश) पाकिस्तानी लष्कराकडून सुरू असलेला रानटी अत्याचार पाहून कर्नल काझी देश सोडून भारतात आले होते. कर्नल काझी सज्जाद अली जहीर यांनी तेव्हा भारतीय लष्कराशी संपर्क साधला आणि १९७१ च्या युद्धात महत्त्वाची भूमिका निभावली होती. तेव्हा पाकिस्तानी लष्काराने त्यांच्याविरुद्ध मृत्यूदंडाच्या शिक्षेचे वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट आजतागायत कायम आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कर्नल जहीर आजही पाकिस्तानच्या वॉन्टेंडच्या यादीत आहेत.
भारतात येताना खिशात होते २० रुपये
सियालकोट सेक्टरमध्ये तैनात करण्यात आलेले कर्नल जहीर हे पाकिस्तानी लष्करातील युवा अधिकारी होते. त्यानंतर मार्च १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानात सुरू झालेले क्रूर अत्याचार आणि नरसंहार पाहता ते भारतात प्रवेश करण्यास यशस्वी झाले. सीमापार करताना त्यांच्या खिशात फक्त २० रुपये होते. सुरुवातीला ते पाकिस्तानी हेर असल्याचा संशय आला होता. भारतात आल्यानंतर त्यांना पठाणकोट येथे नेण्यात आले. तिथे लष्करी अधिकार्यांनी त्यांची आणि पाकिस्तानी लष्कराच्या तैनातीबद्दल चौकशी केली.
पाकिस्तानी लष्कराकडून घराला आग
काझी सज्जाद अली जहीर यांनी भारतात पलायन केल्यानंतर बांगलादेशातील त्यांच्या घराला पाकिस्तानी लष्कराने आग लावली. त्यांच्या आई आणि बहिणीला पाकिस्तानी लष्कराने टार्गेट केले. परंतु त्या तेथून निसटून सुरक्षित स्थळी पोहोचण्यास यशस्वी झाल्या. कर्नल जहीर १९६९ च्या अखेर पाकिस्तानी लष्करात भरती झाले होते. तेव्हा बांगलादेशावर पाकिस्तानचेच शासन होते. पाकिस्तानी लष्कराच्या आर्टिलरी कोरमध्ये सहभागी झालेल्या जहीर यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आले होते.