नवी दिल्ली – ग्राहकांना सहज आणि प्रभावी माहिती मिळण्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पाकिटबंद जंक फूडवर दर्शनी भागात प्रभावी इशारा लावणे आवश्यक आहे, असे विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने (सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हार्यमेंट) म्हटले आहे. या खाद्यपदार्थांच्या दर्शनी भागावर लेबलिंग लावण्याबाबत लवकरच कायदा बनिवण्याची मागणीही केंद्राने केली आहे.
सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण सांगतात, अन्नपदार्थांच्या पाकिटांवर पोषक तत्त्वांबात दिली जाणारी माहिती ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करते. या माहितीमुळे संबंधित पदार्थांमुळे नेमकी काय हानी होणार आहे हे कळत नाही. त्यामुळे ग्राहकांना हानिकारक पदार्थांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिटाच्या दर्शनी भागात लेबलिंग करणे आवश्यक आहे.
जंक फूडबाबत गेल्या सात वर्षांमध्ये चार समित्या तसेच दोन मसुद्यांचे नियमन केलेले आहे. मात्र तरीही भारतातील ग्राहकांना अतिप्रक्रिया केलेल्या (अल्ट्रा प्रोसेस्ड) जंक फूडमध्ये लपलेले वसा, मीठ आणि साखरेच्या हानिकारक स्तराबाबत इशारा देण्यासाठी फ्रंट ऑन पॅक लेबलिंग कायदा अद्याप होऊ शकला नाही.
सीएसईमध्ये अन्नसुरक्षा कार्यक्रमाचे संचालक अमित खुराणा सांगतात, २०१४ एफएसएसएआयतर्फे गठित एका समितीने सर्वात आधी फ्रंट ऑन पॅक लेबलिंगचा प्रस्ताव ठेवला होता. हा कायदा होऊ नये किंवा त्याला तकलादू बनविण्यासाठी पाकिटबंद जंक फूड उद्योग पूर्ण प्रयत्न करत आहे.
एफएसएसएआय स्वतः ग्राहकांचे हितांचे संरक्षण करण्यासाठी कठोर नियम करण्यासाठी हात आखडते घेत आहे. खाद्यपदार्थांच्या चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी तसेच स्थूलत्व कमी करणे, मधुमेह, अतिताण आणि हृदयासंबंधित आजार रोखण्यासाठी अनेक देश विविध पर्याय शोधत आहेत. या संकटाचा मुलांवरही परिणाम होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे संकट आणखी गंभीर होत आहे.