विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
सेवा निवृत्ती नंतर प्रत्येकालाच आपल्या पुढील आयुष्याबद्दल चिंता वाटत असते, कारण वाढत्या वयामुळे म्हातारपणी अनेक आजार उद्भवतात. परंतु या काळात हातात पुरेसा पैसा नसतो. मात्र याकरिता शासनाच्या आणि एलआयसीच्या अनेक योजना आहेत. म्हातारे झाल्यावर काही व्यक्ती कोणतेही काम करण्याच्या स्थितीत राहत नाही, तेव्हा या ५ योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही म्हातारपणाची चिंता संपवू शकता. या योजनांबद्दल जाणून घेऊ या-
एलआयसी सरल पेन्शन योजना: ही जीवन विमा महामंडळाची वार्षिकी योजना आहे. ही योजना ४० ते ८० वर्षांच्या व्यक्तीसाठी आहे. यासाठी किमान गुंतवणुकीची मर्यादा १२ हजार रुपये आहे, यामध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक योगदान देता येते, गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस): एनपीएस ही सर्वात लोकप्रिय, कर-अनुकूल योजना असून सुखी जीवनासाठी निवृत्तीनंतर घेतली जाऊ शकते. यात निश्चित पेन्शन मिळण्याची सुविधा आहे. तीन वर्षे गुंतवणूक पूर्ण केल्यानंतर पैसे काढण्याची सुविधाही आहे. परिपक्वतापूर्वी एकूण ठेवींच्या फक्त २५ टक्के पर्यंत पैसे काढण्याची परवानगी आहे.
अटल पेन्शन योजना: ही विशेष पेन्शन तथा सेवानिवृत्ती योजना १८ ते ४० वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे. वयाच्या ६० वर्षांनंतर, व्यक्तीला त्याच्या पेन्शन संपत्तीच्या १०० टक्के काढण्याची परवानगी दिली जाईल. या योजनेअंतर्गत, सरकार ग्राहकांच्या योगदानाच्या ५० टक्के किंवा वार्षिक १००० रुपये, जे कमी असेल ते योगदान देते.
पीएम वय वंदना योजना : ही योजना १० वर्षासाठी असून ती गेल्या आर्थिक वर्षात ७.४ टक्के व्याज मिळवत होती. ज्यामुळे ती ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आकर्षक योजना बनली असून यात खात्रीशीर परताव्यासह नियमित उत्पन्न मिळते. तीन वर्षांच्या ठेवीनंतर, ७५ टक्के रकमेइतकेच कर्ज घेण्याची सुविधा देखील आहे. यामध्ये जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना: या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. सध्या ते वार्षिक ७.४ टक्के दराने परतावा देत आहे. या योजनेमध्ये, तुम्ही किमान १००० रुपयांच्या गुंतवणूकीसह प्रारंभ करू शकता आणि किमान गुंतवणूक कालावधी ५ वर्षे आहे. त्यानंतर तुम्ही ती आणखी तीन वर्षे वाढवू शकता. ही योजना ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे.