विशेष प्रतिनिधी, मुंबई
जीवनात कोणतीही कामे वेळच्या वेळी केली तर त्याचा मोठा फायदा असतो. दैनंदिन कामाबरोबरच आपली कार्यालयीन कामे असो की, शासकीय पातळीवरील कागदपत्रे जमा करण्याची कामे असोत. वेळच्यावेळी पूर्ण केल्यास त्याचा लाभ होतो. तसेच ऐन वेळी धावपळ होत नाही. तसेच पुढील काळात याबाबत कोणतीही अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या महिन्यात आवश्यक अशी पाच कामे करणे प्रत्येकालाच गरजेचे ठरणार आहे. सर्वांकरिताच सप्टेंबर महिना महत्वाचा ठरणारा आहे, कारण या महिन्यात पैशाशी संबंधित पाच महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील. यापैकी एखाद्या कामाची काही मुदत चुकवली तर आपल्याला दंड देखील होऊ शकतो. कोणती आहेत ही ५ कमी जाणून घेऊ या…
आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत: पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. काही पॅन कार्ड हे आधारशी जोडलेले नाहीत ते कालमर्यादा संपल्यानंतर निष्क्रिय होतील. बँक खाते उघडण्यासाठी आणि इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य ठरणारे आहे.
आधार-पीएफ लिंक करणे अनिवार्य: १ सप्टेंबरपासून पीएफ सभासद तथा नियोक्ता हे आपले योगदान किंवा रक्कम भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यात तेव्हाच जमा करू शकतील जेव्हा त्यांनी आधार कार्ड हे आपल्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी (यूएएन) जोडलेले असेल. पीएफ खातेधारकांना त्यांच्या यूएएनशी आधार कार्ड लिंक केले असेल तरच त्याचा लाभ घेता येईल, ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कर्मचारी किंवा नियोक्ताचे योगदान पीएफ खात्यात जमा केले जाऊ शकत नाही.
डीमॅट खात्यात पूर्ण केवायसी: डिमॅट खाते किंवा ट्रेडिंग खाते असलेल्या गुंतवणूकदारांना डिपॉझिटरींनी दि. ३० सप्टेंबरपर्यंत आपले (केवायसी) तपशील पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. कारण सदर काम वेळेत करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांची खाती निष्क्रिय होतील.
ऑटो डेबिट व्यवहार: आपल्या बँक खात्यातून स्वयं-डेबिट पेमेंटसाठी आपला मोबाईल क्रमांक बँक रेकॉर्डमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. स्वयं-डेबिट मोबाईल संदेश हा म्युच्युअल फंड एसआयपीसाठी दिला जातो. परंतु आरबीआयने १ ऑक्टोबरपासून सर्व बँक खात्याला हा अतिरिक्त घटक अनिवार्य केला आहे. पेमेंटच्या तारखेच्या पाच दिवस आधी आणि कमीतकमी २४ तास आधी तुमच्या मोबाईल क्रमांकावर बँकेने तुम्हाला मेसेज पाठवणे आवश्यक असते.
आर्थिक वर्ष २०२०- २१ साठी आयकर रिटर्न भरणे : आर्थिक वर्ष २०२०- २१ साठी आयकर रिटर्न भरण्याची ३० सप्टेंबर शेवटची तारीख असून त्यासाठी खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही. जर अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरला गेला तर, आपल्याला ५ हजार रुपये लेट फी ( उशीराचे शुल्क ) भरावी लागेल. तथापि, आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तर उशीरा दाखल शुल्क १ हजार रुपयांपेक्षा जास्त नसेल.