दिडोरी – दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे व सोमवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे तालुक्यातील ओझरखेंड व वाघाड हे दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत तर इतर धरणे पुरेसे भरले असून सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणीं पुराचे पाणी शेतात घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे व दिंडोरी तालुक्यासह निफाड, येवला,मनमाड तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची ताहान भागवणारे करंजवण धरण ८० टक्के भरले असून करंजवण धरणातून २०८५२ क्युसेक्स पाणी कादवा नदीपात्रात सोडण्यात आले.त्या प्रमाणे मांजरपाडा ( देवसाने) प्रकल्प परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणे धरणही ८० टक्के भरले असून धरणातून ४००० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग उनंदा नदीपात्रात सोडण्यात आल्यामुळे ओझरखेंड धरण १०० टक्के भरले असून साडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली आहे तर . कालपर्यत मृतसाठ्यामध्ये असणारे तिसगाव धरण ८९ टक्के भरले आहे.
तालुक्यातील करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेंड तीसगाव या सर्व धरणातील नद्याचे पालखेड धरणामध्ये येत असल्यामुळे पालखेड धरणातून आज सकाळी ७ वाजता ३६५०० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग कादवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. करंजवण धरणातून २१००० क्युसेक्स पाणी कादवा नदीत सोडण्यात आल्यामुळे ओझे करंजवण येथील कादवा नदीवरील पुल रात्री दोन वाजेपासून पाण्याखाली गेला आहे तसेच म्हेळुस्के लखमापूर येथील कादवा नदीवरील पुलही पाण्याखाली गेला आहे या दोन्ही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावांमधील संपर्क तुटला आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील ननाशी भागात सकाळ पर्यत विक्रमी ४०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे.तालुक्यातील अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली असून मोठमोठे खड्डे पडले आहे.
वरखेडा कादवा रस्त्यावरील पुल खचला
वरखेडा कादवा रस्त्यावरील एक पुलावरून पुराचे पाणी जात सदर पुल दोन्ही बाजूने खचला असून मध्यभागी खड्डे पडले असून सदर पुल कधीही कोलमडत रस्ता बंद होण्याची चिन्हं आहे.पुराचे पाणी येथील द्राक्ष बागांमध्ये पिकांमध्ये घुसून नुकसान झाले आहे.
तालुक्यात मंगळवारी सकाळी चोवीस तासात विक्रमी १९६ मिमी पाऊस पडला.
दिंडोरी १०४ मिमी
रामशेज. १५५ मिमी
ननाशी. ४०७ मिमी
उमराळे १४० मिमी
लखमापूर २२५ मिमी
कोशिंबे २८१ मिमी
मोहाडी १०२ मिमी
वरखेडा १९१ मिमी
क वणी १५७ मिमी
कुणी नदीपात्रात जाऊ नये
करंजवण धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी (ROS) पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वाढल्यामुळे करंजवण धरणातून २०८५२ क्युसेक्स विसर्ग कादवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे करंजवण धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम असल्यामुळे टप्प्याटप्प्याने पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येईल यासाठी कादवा नदीपात्रा लगत असणाऱ्या गावांनी सतर्क राहून कुणी नदीपात्रात जाऊ नये.
शुभंम भालके ,शाखा अभियंता करंजवण धरण
—–
जिल्हाधिकारी यांचेकडून पालखेड धरणास भेट व आढावा
नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी पालखेड धरणास भेट देत पाहणी केली तसेच तहसीलदार पंकज पवार व पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांकडून संभाव्य पुरस्थितीची माहिती घेत आढावा घेतला.