ओझर: बैलगाडा शर्यतीवरील सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर राज्यात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील ओझरला माजी आमदार अनिल कदम यांनी स्पर्धेचे आयोजन केले. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली बंदी उठल्यानंतर जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत स्पर्धेत सहभाग नोंदवला.
अनेक निर्बंध यासाठी घालून देण्यात आले असल्याने ओझरमिग येथे होणाऱ्या शर्यतीकडे राज्याचे लक्ष लागून होते. राज्यभरातून स्पर्धक यात सहभाग नोंदवला. दरम्यान पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर आली आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्यासह आशिष शिंदे,स्वप्नील कदम, शिवाजी शेजवळ,हर्षल चौधरी,महेश शेजवळ,पिंटू शिंदे,अनिल सोमासे, संजय भिकुले,अमोल भालेराव यांच्यावर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे,उपनिरीक्षक गणपत जाधव करत आहे.
जानोरी रोड वर असलेल्या मोकळ्या जागेत सदर स्पर्धा भरवण्यात आली. परंतु बंदी उठल्यानंतर घेण्यात येणाऱ्या परवानगीचे सोपसकार आयोजकांनी पूर्ण न केल्याने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कारवाईचे आदेश दिल्याचे समजल्यावर स्पर्धेच्या ठिकाणी गाडामालकांची निराशा झाली.सुरवातीच्या काही तासात गाडे धावल्यांनंतर पोलिसांनी सदर ठिकाणी येत नियमांचे उल्लघंन होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर स्पर्धा थांबविण्याची घोषणा पंचांनी केली. त्यानंतर बिल्ला घेण्यासाठी उभ्या असलेल्या बैल जोड्या बराच वेळ उभ्या होत्या. दीड तासाच्या स्थगितीनंतर अखेर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास नोंदणी झालेल्या गाड्यांची शर्यत पार पडली.
बैलगाडा शर्यत सुरू केल्याने आनंदाला उधाण आल्याचे स्पष्ट दिसले.यात काही शर्यतीत गाडे हकताना वृद्ध चालक होते तर अनेक तरुणांची विशेष आवड यातून दिसून आली.ओझर शहर शिवसेना-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजन उत्तम असताना वेळेचे बंधन स्पर्धकांचा उत्साह आणि सहभागी होणाऱ्यांची संख्या कमालीची होती.एकूणच न्यायालयाने बंदी उठवल्याचे स्वागत गाडा मालकांनी केल्याचे दिसले परंतु स्पर्धा घेण्याकसाठीच्या परवानग्या न घेतल्याने पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
प्रथमच बैलगाडा शर्यत
सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर प्रथमच बैलगाडा शर्यत आयोजित केली. गाडा मालक शेतकऱ्यांनाचा उत्साह अमाप होता. एकूणच सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्याने हजारो गाडा शौकिनांनी यात सक्रिय सहभाग नोंदवला. येणाऱ्या काळात बैलगाडा शर्यत ही सुरूच ठेऊ.
– अनिल कदम, माजी आमदार, निफाड