ओझर – स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटर, नाशिकच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि बांगलादेश एलीमेंट्री एजुकेशन इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने भारत-बांगलादेश टेली कोलॅबरेशन प्रकल्प राबविण्यात आला.
भारत आणि बांगलादेशातील सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक माहितीचे,पावर पॉइंट सादरीकरणातून आदानप्रदान केले.
संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) धोरणानुसार २०१५ साली सतरा शाश्वत विकासाचे ध्येय निश्चित ठरविण्यात आले होते.येणाऱ्या २०३० पर्यंत ही ध्येयं जगातील १९३ देशांना गाठायची आहे. युनोने ठरवून दिलेल्या सतरा शाश्वत विकासाच्या ध्येयांबाबत जागरूकता, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात निर्माण व्हावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत सतरा विकासाची ध्येय सरकार आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नातून साध्य झाली पाहिजेत.
शाश्वत विकास ध्येयांचे करंट स्टेटस, टार्गेट्स आणि इंडिकेटर्स ची माहिती ९० मिनिटांच्या १६ सेशन मधून घेण्यात आली. भारत आणि बांगलादेशातील दारिद्र्य निर्मूलन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शुद्ध पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण, महिला आणि बालक सशक्तिकरण, लिंग समानता, आरोग्य सुविधांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेण्यात आली.
जगातील सर्व देशांमधील नागरिकांना शांतता आणि समृद्धी प्राप्त करून देणे हा उद्देश यामागे आहे.
नाशिकचे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिव्याख्याता आणि इको ट्रेनिंग सेंटरचे भारतातील समन्वयक योगेश सोनवणे आणि बांगलादेशाच्या समन्वयक श्रीमती आयेशा सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हायस्कूलच्या शिक्षिका विद्या दौलत पगार आणि त्यांचे बांगलादेशातील सहकारी मोहम्मद शामीशुद्धव्हा झोआ तसेच रचना विद्यालयाच्या सौ सायली अरुण महाजन आणि त्यांचे बांगलादेशातील सहकारी मोहम्मद मुस्तफा कमाल यांनी हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. अनुष्का राजेंद्र निकुंभ, चेतन पाटील,आयुष आहेर देवेश सायखेडकर या विद्यार्थ्यांनीही या प्रकल्पात आपला सहभाग नोंदवला.
खूप छान अनुभव मिळाला
टेली कोलॅबरेशन प्रकल्पाचा खूप छान अनुभव मिळाला.आपल्या शाळेच्या,देशाच्या पलीकडे जाऊन ग्लोबल टीचर होण्याची संधी मिळाली.स्वतःच्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व जाणून होतो परंतु खाऱ्यार्थाने सूक्ष्म अभ्यास करायला मिळाला व आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान अधिकच बळावला.शस्वात विकास ध्येय ऐकून होतो,परंतु यानिमित्ताने सखोल अभ्यास करता आला.या ज्ञानाचा फायदा सहकारी व विद्यार्थ्यांना नक्कीच करणार आहोत.
-सौ.विद्या पगार
शिक्षिका,पिंपळगाव हायस्कूल.