ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– येथील मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोड येथे सावित्रीमाई फुले चौकात गडाख कॉर्नर येथे गुरुवारी झालेल्या अपघातात अर्पिता प्रकाश शिंदे या आठ वर्षाच्या मुलीचे अपघाती निधन झाले तर तिची आई आणि बहिण थोडक्यात बचावली. भारत पेट्रोलियम मधून घरगुती गॅस सिलेंडर भरलेला ट्रक क्रमांक एम एच १५ एचएच २७८४ हा मालवाहतूक ट्रक मालेगाव च्या दिशेने जात होता ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत अर्पिताचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी वाहन चालक याला पोलिसांच्या ताब्यात देत वाहन पोलीस ठाण्यात जमा केले होते.
या अपघातानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बानगंगा नदीच्या पुलावर मुंबई आग्रा महामार्ग वर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तसेच माधवराव बोरस्ते विद्यालय व अभिनव बाल विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळेच महामार्गाला असलेला बोगदा सुरू न झाल्याने या अपघातात चिमुरडीचा बळी गेला आहे . तो बोगदा व तेथे असलेल्या नागरिकांना स्थलांतरित करून लवकरात लवकर हा बोगदा शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करावा अशी मागणी नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सुरेश शिंदे यांच्याकडे केली. यावेळी नागरिकांनी सावित्रीबाई फुले चौक ( गडाख कॉर्नर) तसेच शाळेच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्विस रोडवर गतिरोधक टाकावे अशी मागणी नागरिकांनी केली.
ओझर नगर परिषदेच्या वतीने या सायखेडा चौफुली ते सावित्रीबाई फुले चौक येथे असलेल्या सर्विस रोडच्या बाजूला असलेल्या भाजीपाला फळ विक्रेते, वाहनांच्या पार्किंग हे सर्व अतिक्रमण लवकरात लवकर काढावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. घटनेची गंभीर दाखल घेत ओझर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडून नगरपरिषदेच्या वतीने तात्काळ त्या बोगद्याची स्वच्छता करून देण्यात आली असून यासंदर्भात बोगद्याच्या आजूबाजूला असलेल्या रहिवाशासंदर्भातील पत्रव्यवहार हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी केला असल्याची माहिती किरण देशमुख यांनी दिली. यावेळी यतीन कदम, राजेंद्र शिंदे, प्रदीप आहिरे, प्रकाश महाले, प्रशांत पगार, कामेश शिंदे, नितीन काळे, वसंत वाघमारे, कैलास शिंदे, सचिन आढाव, प्रशांत अक्कर, शब्बीर खाटीक असे अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.