ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येथील मुंबई आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोड येथे सावित्रीमाई फुले चौकात गडाख कॉर्नर येथे झालेल्या अपघातात आठ वर्षाच्या मुलीचे अपघाती निधन झाले तर तिची आई आणि बहिण थोडक्यात बचावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवारी २ जानेवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम मधून घरगुती गॅस सिलेंडर भरलेला ट्रक क्र.एम एच १५ एच एच २७८४ हा मालवाहू ट्रक मालेगाव कडे जात होता.सदर ट्रक ओझर सर्व्हिस रोड वरून जात असताना दुचाकीवर अर्पिता प्रकाश शिंदे, तिची आई आणि बहिण जात होत्या. ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत तिघे खाली पडल्या यात उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केल्यास त्याने ब्रेक लावला त्यात अर्पिता शिंदे ही डाव्या बाजूकडील मागच्या चाकात अडकल्याने जागीच गतप्राण झाली तर आईला आणि बहीणीला पायाला दुखापत झाली.
यावेळी ट्रक चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. तर आईला इस्पितळात दाखल करण्यात आले. अर्पिताचे शवविच्छेदन करण्यासाठी पिंपळगाव येथे पोलीस घेऊन गेले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस करत आहे. ओझर गावात राहणारी अर्पिता शिंदे ही ओझरच्या अभिनव बाल विकास मंदिर येथे इयत्ता तिसरीत शिकत होती. तिच्या दुर्दैवी अपघाताची बातमी समजताच शाळेवर शोककळा पसरली.