सुदर्शन सारडा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओझर नगरपरिषदेच्या ‘पूर्णवेळ’मुख्याधिकारी म्हणून सार्वभौम अनुभवी अधिकारी किरण देशमुख यांची हक्काच्या ठिकाणी पुन्हा शासनाने नियुक्ती केली. एरंडोल,ओझर,येवला,एरंडोल आणि पुन्हा ओझर असे त्यांचे बदली वर्तुळही यानिमित्ताने पूर्ण झाले आहे. ओझर नगरपरिषद अस्तित्वात येऊन चार वर्षाहून अधिक काळ लोटला.ग्रामविकास मधून नगरविकास कडे दत्तक गेलेल्या याच गावाला बराच काळ प्रशासकीय अपंगत्व आले ते पूर्णवेळ अधिकारी नसल्याने!
पूर्णवेळ आणि नंतरच्या काळात अतिरिक्त भार सांभाळणारे देशमुख यांना दोन टोकाची शहरे हाताळताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली.यातूनच काही विभागांमधून झालेली चांदी सर्वसामान्यांना मात्र तितकीच मातीत पळायला लावणारी ठरली. स्थापनेवेळी मुख्याधिकारी दिलीप मेनकर हे काही काळ ओझरच्या सेवेत आले.सर्वसामान्यांची तळमळ ओळखणारे एक उत्तम अभ्यासू म्हणून मेनकर यांची कारकीर्द लोकप्रिय ठरली.त्यानंतर किरण देशमुख नियुक्त झाले.त्यांनी दोन वर्षे ओझरचे कामकाज केले.त्यापूर्वी त्यांनी एरंडोल येथेही काम केले व पुन्हा येवल्याहून मुक्त होत ते तेथेच बदलून गेले. देशमुख यांची कारकीर्द ओझरकरांच्या विशेष स्मरणात राहिली. सुमारे वर्षभर अतिरिक्त भार सांभाळून त्यांनी काही मर्जीतल्या विभागांना सदैव झुकते माप दिले. यात प्रामुख्याने नगररचना,बांधकाम आणि घंटागाडी कंत्राटदार हे त्यांचे आवडते विभाग ठरले.यामुळेच कचरा डेपो, पिण्यात येणारे काळे पाणी, नोंदणी अशा काही सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विभागांना त्यांनी मारलेल्या साईड पट्ट्या अरुचक अशाच म्हणता येतील. काही मर्जीतले ठेकेदार आणि विश्वासू लॉबी कडून केले गेलेले काम फत्ते करण्यात त्यांनी सदैव माहीरता दाखवली. ओझरच्या उपनगरांचा वाढता विस्तार त्यांच्या काळात अधिक व्यापक झाला.
सामान्यांनी दिलेल्या माहिती अधिकार अर्जांना देखील उत्तर देताना त्यांच्यातला त्रयस्थ बाणा अनेक वेळा चर्चेचा विषय ठरला.ओझरच्या प्रशासकीय भवनात दोन तीन मर्जीतले सोडून काही विभागप्रमुखांना देखील त्यांनी सतत जात्यात ठेवत केलेले कामकाज न विसरण्यासारखेच म्हणावे.जूलैत येवला,ओझरहून त्यांची एरंडोल येथे बदली झाल्यानंतर दोन दिवसांनी येवल्याच्या गायकवाड नामक कंत्राटी कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले.पण तेव्हा देशमुख यांच्या जागी दुसरी नियुक्ती झाली नसल्याने त्या बाबत काय तपसात्मक बाबी समोर आल्या हे कळू शकले नाही.
देशमुख यांचे मृदू आणि हलक्या स्वरात बोलणे तितकेच मुद्दामय ठरून जात. अखेरीस येवल्याचे पूर्णवेळ आणि ओझरच्या अतिरिक्त खुर्चीतून दुसऱ्यांदा ते एरंडोल येथे बदलून गेले. त्यानंतर काही काळ दिंडोरीचे संदीप चौधरी रुजूही झाले पण अतिरिक्त आणि पूर्णवेळ याचा अंदाज चौधरी यांनी काही दिवसातच घेतला यावरूनच देशमुख यांच्या अतिरिक्त कारभाराची झलक लक्षात येण्यासारखी आहे. परंतु उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांनी केलेले काम सर्वसामान्यांच्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह ठरले. अखेरीस प्रशासकीय आठवडा संपण्याच्या दिवशी शासनाने पुन्हा देशमुख यांची ओझर येथे दुसऱ्यांदा नियुक्ती केली आहे. यामुळे हजारो ओझरकरांच्या मनात मोठी चर्चा घडून आली. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा ‘वेलकम टू ओझर.. अशी चर्चा असताना देशमुख साहेब ओझर येथे पुन्हा पूर्णवेळ रुजू होताहेत. देशमुख यांच्या नजरेत ‘लाखो ओझरकर’ की ‘श्रीमंत ओझरकर’ पैकी कोणती व्याख्या बसते ते लवकरच कळेल. परंतु राजकीय तीव्रतेने ग्रासलेल्या ओझरला दुसऱ्या इनिंग मध्ये कोणती किरणं मिळतात हे लवकरच स्पष्ट होईल.
आमदार बनकर म्हणतात देशमुख पूर्णवेळ बसून काम करतील.
निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी संजय जाधव यांची नियुक्ती व्हावी असे शिफारस पत्र शासनाला दिले होते.परंतु शासनाने पुन्हा किरण देशमुख यांना नियुक्त केले.याबाबत बनकर यांना संपर्क केला असता त्यांनी ओझरला पूर्णवेळ अधिकारी मिळावा हा महत्वाचा प्रश्न होता.तो आज पूर्ण झाला आहे.आता देशमुख ओझरच्या सेवेत सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत असतील. ओझरच्या कामकाजाबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन त्रुट्या दुरुस्तीबाबत आदेश देऊन शहर विकासाच्या दृष्टीने पावले उचलली जातील असे सूतोवाच आमदार बनकर यांनी दिले.