ओझर: मातीच संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सद्गुरूंची सेव सॉइल ही जागतिक मोहीम लंडनहून सुरू झाली. २४ राष्ट्रांमधून सुमारे २५ हजार किलोमीटर अंतराचा प्रवास करत त्यांचे नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी मालेगाव येथे त्यांचे जिल्हा पोलिप्रमुख सचिन पाटील यांनी स्वागत केले. यावेळी दोघांमध्ये पंधरा मिनिटांची चर्चा झाली. बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचारी हे शेतकरी कुटुंबातून येत असल्याने त्यांना माती संरक्षणासाठी त्याचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याने याची जनजागृती केल्यास त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळेल शिवाय त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे सद्गुरूंनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना सांगितले. यावर पाटील यांनी देखील चार हजार पोलिस संख्या असलेल्या ग्रामीण पोलीस दलात याबाबत जागृती केली जाईल शिवाय नाशिक जिल्हा हा देशात कृषी प्रधान जिल्हा म्हणून अग्रभागी येत असल्याने याचा प्रसार प्रत्येक पोलीस ठाणे मार्फत नागरिकांना केला जाईल असा विश्वास दिला. त्याच प्रमाणे ग्रीन पोलीस ठाणे ही संकल्पना मागील वर्षीपासून जायखेडा पासून सुरू झाली त्याचा विशेष उल्लेख प्रजासत्ताक दिनी झाला त्याचा गतीने विस्तार करत पोलीस मुख्यालय,पोलीस ठाणे येथील आवारात माती संवर्धन करत एक अभिनव उपक्रम राबविण्यात येईल असा विश्वास सचिन पाटील यांनी देत सदर उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.दहा मिनिटांच्या चर्चेनंतर सद्गुरू यांचे चांदवड,पिंपळगाव,आंबेहील येथे स्वागत करण्यात आले.
नाशिक ग्रामीण हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाणे आवारात व परिसरात दरवर्षी नियमितपणे वृक्षारोपण करत संवर्धन केले जाते, त्याची दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या प्रजासत्ताक दिनी केलेल्या भाषणात केला होता. आता देखील वृक्षांच्या सभोवताली असलेल्या मातीचे संवर्धन करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
सचिन पाटील हे शेतीची जाण असलेले अधिकारी
नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे एक उत्तम शेती तज्ज्ञ असून त्यांची शेती अभ्यासक म्हणूनही लौकिक आहे. सनदी अधिकारी होण्यापूर्वी त्यांनी केलेली गुलाब,द्राक्ष शेती ही निर्यातक्षम दर्जाची होती.आजही पोलीस दलात वरिष्ठ अधिकारी असताना त्यांचे शेतीवर असलेले लक्ष्य तितकेच अभ्यासपूर्ण आहे.त्यामुळे सेव सॉईल ही मोहीम नियोजनबद्ध राबवल्यास उच्च पीक व त्यातून मिळणारे उत्पन्न याची दरी बुजण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.