नाशिक – ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)ने शनिवार ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. मिग, सुखोई यासारख्या लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या एचएएल कारखान्याने आता खासगी विमाने आणि हेलिकॉप्टर्सच्या देखभाल व दुरुस्ती (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरऑल अर्थात एमआरओ) या क्षेत्रातही आरंभ केला आहे. आजवर हे काम कधीही येथे झालेले नाही. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर या अभियानाअंतर्गत देशातील पहिले खासगी हेलिकॉप्टरचे पेन्ट (रंगकाम) ओझर एचएएलच्या कारखान्यात यशस्वीरित्या झाले आहे. एस्सार ग्रुपची उपकंपनी असलेल्या फ्युचरा ट्रॅव्हल्स लिमिटेड या कंपनीचे हेलिकॉप्टर पेन्ट करुन या कंपनीला सुपुर्द करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधांमुळे अत्यंत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत ओझर एचएएलमध्ये या सुपूर्द सोहळा संपन्न झाला आहे. याप्रसंगी एचएएलचे सीईओ डी मैती, फ्युचराचे चीफ पायलट कॅप्टन ज्योतिकुमार राव, एचएएलचे महाव्यवस्थापक दीपक सिंघल, एस के मेहता, साकेत चतुर्वेदी हे उपस्थित होते.
नाशिकला असा होणार फायदा
खासगी विमान व हेलिकॉप्टर्सच्या दुरुस्ती व देखभालीचे एक खासगी केंद्र सद्यस्थितीत बंगळुरू येथे आहे. तेथे काही प्रमाणात कामे चालतात. मात्र, बहुतांश कामे ही सिंगापूर व अन्य देशांकडेच जातात. आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत ओझर एचएएलमध्ये लढाऊ विमानांच्या निर्मिती बरोबर आता खासगी विमानांची देखभाल व दुरुस्ती होणार असल्याने मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे. त्यामुळे व्यावसायिक पातळीवरही एचएएलला मोठी संधी प्राप्त होणार आहे. सहाजिकच त्याचा फायदा नाशिकलाही होणार आहे.
अत्याधुनिक सुविधा
ओझर एचएएलमधील पेन्ट शॉप आणि अन्य सुविधा या जागतिक दर्जाच्या आहेत. अन्य सुविधाही येथे अत्याधुनिक दर्जाच्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या सुसज्ज कारखान्यात सेवा मिळणार असल्याने खासगी विमानांचे मोठे काम येथे मिळणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
लवकरच दोन विमाने येणार
हेलिकॉप्टरचे पेन्ट यशस्वी झाल्यानंतर आता लवकरच दोन खासगी विमानांचे कामही ओझर एचएएलला मिळणार आहे. तशी माहिती मॅब एव्हिएशनचे संचालक मंदार भारदे यांनी दिली आहे. तसेच, यापुढील काळात येथे कामांसाठी अक्षरशः रांग लागण्याची चिन्हे आहेत.
प्रवासी वाहतुकीला फायदा
खासगी विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम वेगाने सुरू झाले तर त्याचा मोठा फायदा ओझर विमानतळावरुन सध्या सुरू असलेल्या खासगी प्रवासी वाहतुकीला होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यानिमित्ताने विविध कंपन्या या विमानतळाची चाचपणी करतील आणि येथून सेवा सुरू करण्यास प्राधान्य देतील.