ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -येथील गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीपासून टाळाखोरांचा अड्डा बनलेल्या जुन्या बस स्थानकात सोमवारी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की, ओझर स्थानकाच्या प्रवासी प्रतीक्षा गृहात युवक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिसांना समजले. त्यावेळी पोलिसांनी पाहणी केल्यानंतर सदर युवकाची हत्या झाल्याचे समोर आले. मृताचे नाव तुषार शिवाजी कडाळे वय २७ असून राहणार पवारवाडी दिक्षी, सध्याचे मुक्काम भेंडाळी तालुका निफाड असल्याचे समजते.
या घटनेने ओझर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून ही हत्या कौटुंबिक अथवा जुन्या वादातून घडली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे
मयत तुषार हा सत्तावीस वर्षाचा विवाहित असल्याने त्याला दोन वर्षाची लहान मुलगी आहे. या हत्येचा तपास पोलीस करीत आहे. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या टवाळखोरांवर वचक बसवण्यास कोणत्याही अधिकाऱ्याला यश आले नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
गरदुल्ल्यांच्या सततच्या रेलचेल मुळे ओस पडलेल्या ओझर बसस्थानकाची गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांनी स्वच्छता करावी अशी मागणी नगर परिषदेकडे केली होती. तसेच पिंपळगाव बस स्थानकाचे अधिकारी यांनाही या बसस्थानकाकडे लक्ष देण्याची विनंती नागरिकांनी केली होती. तरी कोणीही या बसस्थानकाला वाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच टवाळखोरांना धाक उरला नसल्यानेच सोमवारी रात्री एकाचा खून झाल्याची चर्चा नागरिकांत आहे.
या घटनेचा तपास नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखलेकर उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस स्टेशनचे अधिकारी अरुण धनवटे करीत आहेत.