ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा मृतदेह अखेर सायखेडा रोडवरील शिव रस्त्यावर विहिरीत आढळून आला.
याबाबत माहिती अशी की १९ सप्टेंबर रोजी ओझर येथील तानाजी चौकात राहणाऱ्या शोभा विलास जाधव या ३४ वर्षीय विवाहितेने घरात कुणाला काही न सांगता बाहेर निघून गेल्या त्यानंतर घरच्यांनी दिवसभर शोध घेतल्यानंतर त्या मिळून आल्या नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचे पती विलास महादू जाधव यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी याबाबत हरवल्याची नोंद घेतल्यानंतर सर्व नातेवाईकांनी शोभा जाधव यांच्या शोधार्थ परिसर व नातेवाईकांच्या गावात जाऊन शोध सुरू केला.परंतु त्या सापडून आल्या नाहीत.
शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास भडके वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या विहिरीची मोटार चालू करायला तेथील शेत मजूर गेला असता सततच्या पावसाने विहिरीतील पाण्याची पातळी वाढल्याने त्यास एक महिला पाण्यावर तरंगताना दिसून आली. त्यांनी तातडीने पोलिसाना याबाबत माहिती दिली असता विलास जाधव यांना तेथे बोलावण्यात आले. एकूण दिलेल्या माहितीवरून सदर व्यक्ती या शोभा जाधव असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शव बाहेर काढत पंचनामा करत मृतदेह पिंपळगाव येथे शवविच्छेदन करता पाठवला.
सदर घटनेने उपस्थित पती आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. जाधव दांपत्यास दोन मुली असून मोठी मुलगी माधवराव बोरस्ते विद्यालयात शिकत असून शिक्षक प्रिय आणि विशेष प्राविण्यवान विद्यार्थिनी म्हणून तिचा लौकिक आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर शोभा जाधव यांच्यावर मूळगावी चाटोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.