नवी दिल्ली – भारतात कोरोना रुग्णांची लक्षणीय वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अनेक आवश्यक उपकरणांचाही अभाव आहे. या गोष्टी लक्षात घेऊन पीएम केअर्स फंडमधून १०० नव्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅंट उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. सरकारच्या अधिकार प्राप्त एम्पावर्ड ग्रुप २ ने पीएम केअर फंडाद्वारे १०० नवे रुग्णालये तयार करण्यासह त्यामध्ये ऑक्सिजन प्लँट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ५० हजार मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णयही घेतला आहे.
ऑक्सिजनची मागणी करणा-या १२ राज्यांची ट्रेसिंग आणि मॅपिंग करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळमध्ये ऑक्सिजनची सर्वात जास्त मागणी आहे.
ऑक्सिजन आयात करण्यासाठी लवरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. पीएम केअर फंडातून ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा या परिस्थितीवर एम्पावर्ड ग्रुप २ लक्ष ठेवून आहे.
रुग्णालये ओळखणार
प्रेशन स्विंग एडसोरप्शन (पीएसए) प्लँट ऑक्सिजनची निर्मिती करतात. तसेच वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी रुग्णालयांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करतात. स्वीकृत १६२ पीएसए प्लँटचा रुग्णालयात ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी सूक्ष्मरित्या आढावा घेण्यात येत आहे. ग्रुप २ ने गृहमंत्रालयाला पीएसए प्लँटच्या १०० रुग्णालयांच्या ओळख पटवण्याची विनंती केली आहे.
१२ राज्यात सर्वाधिक मागणी
राज्यांमधील आवश्यक वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा तसेच स्त्रोत आणि त्यांच्या उत्पादनाची क्षमता याबाबत पथदर्शी आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑक्सिजनच्या स्त्रोतांबाबत राज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. २०, २५ आणि ३० एप्रिलला त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी १२ राज्यांना ४८८० मेट्रिकटन, ५६१९ मेट्रिकटन आणि ६५९३ मेट्रिकटनचा ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.