खासदार गोडसे यांच्या प्रयत्नाना यश
नाशिक : कोरोनावर उपाययोजना म्हणून प्रभावी असलेल्या आॉक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी उपाययोजना उभारण्यात खासदार गोडसे यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. प्रेसच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्हयातील तिन रूग्णालयांमध्ये स्वंय निर्मित आक्सिजन युनिट मंजूर केल्यानंतर आता बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीने गिरणारे येथील ग्रामिण रूग्णालयात स्वंय निर्मिती आक्सिजन युनिट बसविण्यात येणार आहे. सदर मशिन आज बडोदा येथून निघणार असून गुरूवारपर्यत मशिन प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे . या स्वंयम निर्मिती ऑक्सिजन युनिटमुळे गिरणारे आणि पंचक्रोशीतील रूग्णांना ऑाक्सिजन तुटवड्यापासून निश्चितच दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने जिल्ह्यामध्ये थैमान घातल्याने अशातच ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी जोमाने प्रयत्न सुरू केले आहे. गोडसे यांच्या प्रयत्नातून आठवडयाभरापूर्वी इंडिया सेक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड ,सिन्नर आणि इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन युनिट बसविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गिरणारे आणि पंचक्रोशीतील बाधित रुग्णांची ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी होत असून या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी खा. गोडसे यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन गोडसे यांनी गिरणारे ग्रामीण रुग्णालयात युनिट बसविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.गोडसे यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेशी संपर्क साधत ऑक्सीजन युनिटसाठी मदतीचे आवाहन केले होते.
खा. गोडसे यांच्या आवाहनाला बांधकाम व्यवसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. खासदार हेमंत गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल बडोदा येथे जाऊन स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटच्या प्लांटची पाहणी करत कंपनीचे कार्यकारी अधिकारी जगदीश शर्मा यांच्याशी युनिटच्या कार्यक्षमतेविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्योजक भाऊसाहेब सांगळे,नगरसेवक आर.डी. धोंगडे आदी उपस्थित होते. यातूनच आता गिरणारे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन युनिट बसविण्यात येणार आहे . हे युनिट बडोदा येथील Airro (ॲरो) या कंपनीतून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निमिर्तीची क्षमता प्रतितास ५ एन.एम.क्यू. इतकी म्हणजे ८३ लिटर अशी असणार आहे. या युनिटमुळे सुमारे २५ रुग्णांना २४ तास ऑक्सिजन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आजच एका विशेष वाहनाने ऑाक्सिजन युनिट गिरणारे येथे पोहच करण्यासाठी निघाले आहे. येत्या दोन दिवसात या युनिटचे इन्स्टॉलेशन होणार असून गुरुवारपर्यंत युनिट कार्यान्वित होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.