नाशिक – कोरोनाच्या दुस-या लाटेत मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. घरातील कर्ता-धर्ता कुटूंबप्रमुख हरपल्याने दुस-या लाटेत अनेक कुटूंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऑक्सिजनअभावी रूग्णाचा जीव जात असल्याने जिल्ह्याातील सर्वच रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन युनिट बसविण्यासाठी आम्ही घेतलेल्या पुढाकाराला चांगलेच यश आले आहे. ऑक्सिजन युनिटसाठी अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्याचा आनंद आहे. विविध स्तरातील सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधीलकी एकत्रितपणे पार पाडल्यास ऑक्सिजनच्या तुटवड्यावर आपण निश्चितच मात करू असा विश्वास खासदार गोडसे यांनी सैय्यद पिंप्री येथे बोलतांना व्यक्त केला. यावेळी खासदार गोडसे यांनी सैय्यद पिंप्री ग्रामीण रूग्णालयात स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारण्यास विशेष योगदान देणा-या ओझर येथील इराल कंपनीचे कौतुक केले.
सैय्यद पिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खा. गोडसे यांच्या पुढाकाराने आणि ओझर येथील इराल कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून उभारलेल्या स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिट कार्यान्वित करण्यात आले. या युनिटचा आज सकाळी खासदार गोडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. गोडसे बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, इराल कंपनीचे सी.ई.ओ. अशोककुमार सिंह, मॅनेजर अभिषेक स्वर्णकार, एक्सीक्युटिव्ह संदिप शेटे, आकाष लांडगे, डॅा. किरवले, सरपंच मधुकर ढिकले, जगन्नाथ ढिकले, अनिल ढिकले, दत्तात्रय ढिकले, भाऊसाहेब ढिकले, सुभाश ढिकले, अंबादास ढिकले, सुरेष ढिकले, आत्माराम दाते, बहिरू जाधव, विजय रिकामे, भास्कर कहांडळ, बापु कहांडळ, कैलास ढिकले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्याा संख्येने उपस्थित होते. यावेळी खा.गोडसे यांच्या हस्ते सुमारे ५० कोरोना योध्यांचा सन्मान करून त्यांना विशेष प्रमाणपत्र देण्यात आले.
समाजातील प्रत्येक घटकाने कोरोना विरूद्धच्या लढयात इराल कंपनीसारखे योगदान देत सामाजिक बांधिलकी जोपासली तर लवकरच संपूर्ण समाज कोरोनामुक्त होणार यात शंका नसल्याचा विश्वास यावेळी खा.गोडसे यांनी व्यक्त केला. नाशिक शहरासह संपुर्ण जिल्ह्याात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रूग्णांचा हकनाक बळी जात आहे. घरातील कर्ता-धर्ता कुटूंबप्रमुख हरपल्याने दुस-या लाटेत अनेक कुटूंब उघड्यावर पडले आहेत. जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये. यासाठी समाजातील सर्वच घटकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे खा.गोडसे यांनी सांगितले.