विशेष प्रतिनिधी, भोपाळ (मध्य प्रदेश)
झारखंडच्या बोकारो येथून मध्य प्रदेशकडे निघालेला द्राव्य ऑक्सिजन टँकर रविवारी (२५ एप्रिल) उत्तर प्रदेशमध्ये रोखण्यात आला. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर उत्तर प्रदेशचे अधिकारी सक्रिय झाले. त्यानंतर टँकरला मध्य प्रदेशला जाण्यास परवानगी देण्यात आली.
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी बोकारोहून हा टँकर निघाला होता. परंतु त्याला झाशी येथे रोखण्यात आले. हे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधला. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोणतेही राज्य इतर राज्यांचे ऑक्सिजन टँकर रोखू शकत नाही, असे सांगत केंद्राच्या वरिष्ठ अधिकार्यांनी उत्तर प्रदेशच्या अधिकार्यांना चांगलेच फटकारले.
संभ्रमामुळे रोखला टँकर
मध्य प्रदेशच्या गृह विभागाकडून उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संवाद साधण्यात आला. आयनॉक्स कंपनीचा हा टँकर मध्य प्रदेशसाठी पाठविण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजेश राजौरा म्हणाले, की संभ्रमामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर टँकरच्या वाहतुकीला मंजुरी दिल्याचे उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अपर मुख्य सचिवांनी दूरध्वनीवरून स्पष्ट केले.
पोलिसांचे संरक्षण
दरम्यान, द्रव्य स्वरूपातील हा टँकर निर्धारित ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी मार्गांमध्ये बदल करण्यात आले. महोबा (उत्तर प्रदेश) आणि छतरपूर (मध्य प्रदेश) सीमेवर किमहा नाक्यावर पहाटे उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी टँकरला मध्य प्रदेशच्या पोलिसांना सोपवले.
यापूर्वी मध्य प्रदेशचे ऑक्सिजन टँकर हरियाणा, गुजराथ आणि महाराष्ट्रात रोखण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. तेव्हा टँकरच्या वाहतुकीला परवानगी मिळाली होती.