भोपाळ – कोरोनाच्या दुसर्या लाटेत संक्रमित झालेल्या रुग्णांची ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. अशा परिस्थितीत रूग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याने काही रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याविना घरात ऑक्सिजन घेत आहेत, परंतु ही उपचार पद्धत त्यांना बरे करण्या ऐवजी पुन्हा आजारी बनवू शकते.
भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजच्या पल्मोनरी मेडिसिन विभागाचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेश सरकारच्या कोरोना विभागातील सल्लागार डॉ. लोकेंद्र दवे म्हणाले की, ऑक्सिजन घेतल्यामुळे हा आजार लवकर बरा होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. ऑक्सिजनची पातळी ९० टक्क्यांपर्यंत खाली येते, तेव्हाच ऑक्सिजन घ्यावा. परंतु ऑक्सिजनची पातळी ९२ टक्के असेल तर जादा कृत्रिम ऑक्सिजन देऊन शरीरात ऑक्सिडंट फ्री रेडिकल्स तयार होतात. त्यामुळे अधिक ऑक्सिजन आणि फ्री रॅडिकल्स तयार झाल्यामुळे शरीरातील सामान्य पेशी खराब होतात. तसेच दीर्घकाळ कृत्रिम ऑक्सिजनचे समर्थन राहील्यास फुफ्फुसांना सर्वाधिक त्रास होतो.
डॉ. लोकेंद्र दवे पुढे म्हणाले की, जर गरज नसताना रुग्ण ऑक्सिजनच्या आधारावर असाल तर समस्या उद्भवेल. प्रति मिनिट १० लिटर किंवा त्या पेक्षा जास्त ऑक्सिजन सुमारे १५ दिवसांपेक्षा जास्त दिले गेले तर फुफ्फुसे कायमस्वरुपी खराब होऊ शकतात.
जास्त ऑक्सिजनच्या दुष्परिणामांना ऑक्सिजन विषाक्तपणा म्हणतात. तसेच रुग्णात ऑक्सिजनची आवश्यकता वेगवेगळी असते. जेव्हा एखाद्या रुग्णाला किती ऑक्सिजनची आवश्यकता असते, तेव्हा केवळ डॉक्टरांनाच समजू शकते, म्हणून जर कोणी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ऑक्सिजन घेत असेल तर ते धोकादायक ठरू शकते.
ऑक्सिजनचा आधार आवश्यकतेनुसार रुग्णाला द्यावा. जर ऑक्सिजन ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर प्रति मिनिट एक ते चार लिटरपर्यंत ऑक्सिजन दिले जाऊ शकते. नवजात मुलांना अधिक ऑक्सिजन दिल्यामुळे त्यांच्या डोळ्यातील रक्तवाहिन्या फुटू लागतात. तसेच व्हेंटिलेटरच्या सहाय्याने रूग्णांना प्रति मिनिट २५ लिटर या वेगाने ऑक्सिजन द्यावे लागतो. अशा परिस्थितीत, १० ते १५ दिवस व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसात मुक्त रॅडिकल्स तयार झाल्यामुळे काही प्रमाणात कायमचे नुकसान होते.