नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा पाहता दिल्ली उच्च न्यायालय भयंकर चिडले आहे. दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवटा होत नसल्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्याची ही कोरोना लाट नाही तर ती त्सुनामी आहे. ऑक्सिजनचा पुरवठा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यात जर कुणी अडथळा आणत असेल तर आम्ही त्याला थेट फासावर लटकवू असा गंभीर इशाराच न्यायालयाने दिला आहे.
राजधानी दिल्लीसह देशात कोरोना प्रादुर्भावामुळे अतिशय भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा ही महत्त्वाची बाब आहे. हा पुरवठा होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्याची दखल घेत येथील एका खासगी हॉस्पिटलने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी आज झाली. न्यायमूर्ती विपीन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीत न्यायपीठाने तीव्र संताप व्यक्त केला. ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने आणि योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. ऑक्सिजनशिवाय कुणीही गतप्राण होणं ही बाब अतिशय दुःखद आणि गंभीर आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, ऑक्सिजनच्या पुरवठ्यात जर कुणी अडथळा आणत असेल तर आम्ही त्याला थेट फासावर लटकवू, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारकडे खुलासा मागितला आहे. मे महिन्यात कोरोनाची लाट मोठी उसळी घेण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी ज्या काही आरोग्य सुविधा आवश्यक आहेत. त्याच्या उपलब्धतेसाठी सरकारने काय तयारी केली आहे, हे सुद्धा न्यायालयाने सरकारकडे मागितले आहे. ञक्सिजनच्या पुरवठ्याबाबत विविध विभाग आणि सरकारांनी उत्तम समन्वय ठेवावा, असेही न्यायालयाने बजावले आहे.