नवी दिल्ली – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना आता देशाची राजधानी दिल्लीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या हाहाकारात दिल्लीत आणखी एक वेदनादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे गेल्या २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालकांनी सांगितले की, गेल्या दिवसभरात २५ आजारी रूग्णांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात फक्त दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे आणि सुमारे ६५ रुग्णांच्या जीवाला धोका आहे. वैद्यकीय संचालक पुढे म्हणाले की, आयसीयू आणि आपत्कालीन वैद्यकीय विभागात विना-यांत्रिकी पद्धतीने ऑक्सिजन पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजधानी दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेनंतर काही रुग्णालयांनी कोरोना बाधित नवीन रुग्णांची भरती थांबवली आहे.
सध्या दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ५०० हून अधिक संक्रमित रुग्ण दाखल असून यातील १५०रुग्ण ‘हाय फ्लो ऑक्सिजन सपोर्ट’ वर आहेत. आरोग्य केंद्रात फक्त पाच तास ऑक्सिजन शिल्लक असल्याचे सांगत रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री आपत्कालीन संदेश सरकारला पाठविला आणि त्वरित पुरवठा करावा, अशी विनंती केली. गेल्या चार दिवसांत शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थेला परिणाम झाला आहे. काही रुग्णालयांनी दिल्ली सरकारला इतर आरोग्य केंद्रांवरही रुग्ण पाठविण्याची विनंती केली.
त्याचप्रमाणे दिल्लीतील हिंदूराव रूग्णालयात देखील ऑक्सिजनचा कमी साठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आयसीयूला उर्वरित ऑक्सिजन आणि अन्य प्रभागातील ऑक्सिजन केंद्राचा वापर करण्यास सांगितले गेले आहे, ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता रुग्णालयाने नवीन कोरोना रूग्णांची भरती थांबविली आहे. त्याचप्रमाणे रोहिणी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ऑक्सिजनच्या टंचाईनंतर नवीन रुग्णांची भरती बंद करण्यात आली आहे. तसेच अपोलो, मॅक्स, विम्हन्स सारख्या रुग्णालयात नवीन रूग्णांसाठी काही काळ प्रवेश बंद आहे.