केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या सुचना
मुंबई – जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल यावर भर द्यावा आणि पन्नासहून अधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा अशा सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील, कळंब तालुक्यात चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पात उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन शुक्रवारी ते दूरदृश्य प्रणालीव्दारे बोलत होते. राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण व्हायचं असेल याबाबत गडकरी या सुचना केल्या.
या कार्यक्रमात राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमास केंद्रीय रस्ते विकास आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील व्हीसीव्दारे सहभागी झाले. यावेळी कारखाना स्थळावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार कैलास पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाविरुद्धचा पहिला लढा तर आपण जिंकला आहे. पहिल्या लाटेत आपण मोठ्या प्रमाणावर टेस्टींग लॅब उभारल्या. कोविड केअर सेंटर उभारले, बेडची क्षमता वाढवली. पण दुसऱ्या लाटेचे आव्हान मोठे आहे. मात्र आता राज्याच्या विविध भागातून येणारे अहवाल पाहिले असता आता या लाटेवरही आपण मात करू शकू, असा विश्वास मला आहे. पण त्यासाठी आपण ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वावलंबी व्हायला हवे. आपल्या राज्यात बाराशे मेट्रीक टन ऑक्सिजन निर्माण होतो. आपली गरज साधारणतः सतराशे मेट्रीक टन आहे. पण आपल्याला तीन हजार मेट्रीक टन निर्मिती करायची आहे. तरच आपण स्वावलंबी होऊ शकू.
राज्यातील विविध महानगरपालिकांचे ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता सहकार, उद्योग क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पात काही फेरबदल करुन विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्त्वाचा आहे. यापासून इतर उद्योग आणि सहकारी साखर कारखान्यांनी प्रेरणा घ्यावी असेही ते म्हणाले.