नाशिक – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर दाखल झाली आहे. ही एक्सप्रेस विशाखापट्टणम येथून निघाली होती. या एक्सप्रेसच्या माध्यमातून २५ के.एल. चे दोन टँकर नाशिकला प्राप्त होणार आहेत. देवळाली मालधक्का येथे ही ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ व्यवस्थीतरित्या पोहोचली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन व प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय राखून नियोजन केले. पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे व अन्य अधिकारी सध्या नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर हजर आहेत.
या एक्सप्रेसमुळे नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी दोन ऑक्सिजन टॅंक पुरविण्यात येणार आहेत. या एक्सप्रेसमार्फत प्राप्त होणारा ऑक्सिजन हा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यास आपणास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसात आपणास ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन ऐवजी ५६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होत होता, यातील तफावत आज येणाऱ्या अधिकच्या ५० मेट्रिक टन ऑक्सिजन टँकरमुळे भरून निघणार आहे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले आहे.
२५ किलोलीटरच्या दोन ऑक्सिजन टँकरमुळे एकूण ५० मेट्रिक टन प्राप्त होणारा ऑक्सिजन एकाच दिवसात वापरून न संपवता, ज्याठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प आहेत, तेथे या ऑक्सिजनचा काही प्रमाणात साठा करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले आहे. जेणेकरून अतिआवश्यक समयी साठवून ठेवण्यात आलेल्या या ऑक्सिजनचा वापर करणे शक्य होणार आहे. रेल्वे मार्गे येणाऱ्या ऑक्सिजन टॅंकसाठी दोन मोबाईल व्हॅन रेल्वे ट्रॅकवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
https://www.facebook.com/watch/?v=800318090919438