अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जर तुम्ही तुमचे वाहन दुसर्याला चालवायला देत असाल, तर खात्री करुन घ्या की तुम्ही योग्य व्यक्तीकडे आपले वाहन देत आहात. नाहीतर त्या चालकाच्या चुकीची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. नुकतेच असे एक प्रकरण समोर आले असून, रस्ते अपघातात चालकाच्या चुकीमुळे वाहन मालकाला २४ लाख रुपयांची भुर्दंड सोसावा लागला आहे. शिवाय, या चालकाच्या चुकीमुळे त्याचा मित्र ८० टक्के अपंग झाला असून दुसरा मित्रही जखमी झाला आहे.
आरोपी चालक त्याच्या दोन मित्रांसह मालकाच्या व्यावसायिक वाहनासह मौजमजेसाठी बाहेर पडला होता. पहाटेची वेळ असल्याने त्याने भरधाव वेगाने वाहन चालवण्यास सुरुवात केली. नेमके रस्त्याच्या मध्येच एक ट्रक उभा होता. त्यावर जाऊन हे वाहन आदळले. या अपघातात चालकाचे दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले आहेत. उपचारादरम्यान चालकाच्या मित्राला एक पाय गमवावा लागला, तर दुसऱ्या मित्रालाही दुखापत झाली आहे.
हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर वाहन चालकाचा दोष कोर्टात सिद्ध झाला. पण खरी समस्या तर तेव्हा निर्माण झाली जेव्हा विमा कंपनीने दोन्ही पीडितांना साक्षीदार म्हणून बोलावले आणि विचारले की ते वाहनात काही कामासाठी गेले होते का. यावर पीडित दोघांनी सांगितले की, ते मौजमजेसाठी बाहेर गेले होते आणि त्यांचा मित्र वाहन चालवत होता. वाहनाचा वेगही खूप होता आणि अतिशय बेपर्वाईने तो वाहन चालवत होता. त्यामुळे या अपघातास वाहन चालक वैयक्तिकरित्या जबाबदार आहे असे सांगत विमा कंपनीने वाहनाचा मालक किंवा चालक यांना नुकसानभरपाईचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्लीतील साकेत येथील न्यायाधीश डॉ. हरदीप कौर यांच्या न्यायालयाने विमा कंपनीचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि वाहन मालकाला दोन्ही पीडितांना नुकसानभरपाईची रक्कम देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही रक्कम नंतर चालकाकडून वसूल करण्याचा दावाही वाहन मालक करू शकतो, असेही न्यायालयाने वाहन मालकाला सांगितले. २४ डिसेंबर २०१८ रोजी ही घटना घडली होती. त्याचा निकाल आता जाहीर झाल्याने पुन्हा ही घटना प्रकाशात आली आहे.
भविष्यातील कमाई, अपंगत्वामुळे होणारी मानसिक व शारीरिक अस्वस्थता, इतरांवर अवलंबून राहणे, अशा विविध बाबींतर्गत या रस्ता अपघातातील ८० टक्के अपंगत्व असलेल्या २२ वर्षीय तरुणाला २३ लाख चार हजार ६४९ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यापैकी तीन लाख रुपये रोख स्वरुपात देण्यास सांगितले आहे, तर वीस लाख रुपये स्टेट बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून दरमहा २५ हजार रुपये व्याज त्याला मिळत राहावेत.
या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या दुसऱ्या मित्राला १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने वाहन मालकाला दिले आहेत. नुकसान भरपाईच्या दोन्ही रकमेवर नऊ टक्के व्याज देण्यासही न्यायालयाने सांगितले आहे.