छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना कन्नड घाट (औट्रम) जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या मार्गावरून केवळ खासगी प्रवासी व सार्वजनिक प्रवासी वाहतुक सुरू राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून (११ ऑगस्ट) सुरू झाली आहे.
चाळीसगाव दरम्यानचा औट्रम घाट (कन्नड घाट) ११ ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. बंदी घातलेल्या वाहनांमध्ये ट्रक, ट्रेलर, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारे टँकर, दुधाचे टँकर आदींचा समावेश आहे. या वाहनांसाठी छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद टी पॉइंट-देवगाव रंगारी-शिऊर बंगला-वाकळा-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगाव हा मार्ग सुचविण्यात आला आहे. या संदर्भात ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. नीलेश देसले, ॲड. श्रीकृष्ण चौधरी यांनी जनहित याचिका दाखल केली होती.
औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, खासगी आराम बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, अग्निशमन दलाची वाहने, शेतीपयोगी ट्रॅक्टर, ॲम्ब्युलन्स, विशेष परिस्थितीत संरक्षक दलाची वाहने यांनाच वाहतुकीसाठी परवानगी असेल. इतर जड वाहनांसाठी न्यायालयाने पर्यायी मार्ग सुचवला आहे. औट्रम घाटात दुरुस्तीला परवानगी देतानाच गौताळा अभयारण्यातून जाणाऱ्या गौताळा घाटाच्या दुरुस्ती व इतर कामांना प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथील आरटीओ, दोन्ही ठिकाणे पोलिस अधिक्षक, चाळीसगावच्या पोलिस उपाधिक्षकांना देण्यात आले आहेत.
तरीही मागणी फेटाळली
या घाटातून जड वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केल्याने टोलचे नुकसान होईल, असा मुद्दा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी मांडला. घाटातील वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांचे होणारे हाल, घाटात घडणारे गुन्हे आदींचा संदर्भ देत खंडपीठाने त्यांचे म्हणणे फेटाळले.
outram kannad ghat heavy vehicle banned court order
no entry chhatrapati sambhaji nagar