इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या ओडिशा राज्यांमध्ये हनीट्रॅप प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले आहे. अनेकांना या प्रकरणाची मोठी भीती निर्माण झाली आहे. कारण मी तोंड उघडले तर सगळे काही बदलेले, असा धमकीवजा इशारा हनीट्रॅप प्रकरणातील आरोपी अर्चनाने दिला आहे. मात्र आता अनेकांना हनीट्रॅप करणाऱ्या जोडप्याची चौकशी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुरू केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अर्चना नाग हिने केलेल्या कथित दाव्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला ‘हनी ट्रॅप’ म्हणतात. पुर्वी हेरगिरीच्या जगात ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. या प्रकारावर अनेक चित्रपटही होऊन गेले आहेत.
वास्तविक ‘हनी ट्रॅप’ हा प्रकार नवा नाही. याचे काही दाखले आपल्याला पुराणातही मिळतात. अलीकडे महायुद्धांच्या काळातही शत्रू राष्ट्राची माहिती काढून घेण्यासाठी परस्परांविरोधात ‘हनी ट्रॅप’ लावले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक क्षेत्रात अशी उदाहरणे दितात. राजकारण, कॉर्पोरेट, क्रीडा सर्वच क्षेत्रांमध्ये काही वेळा याचा वापर होत आला आहे. सध्या ओडिशा राज्यात हा प्रकार सुरू आहे
पूर्वी ‘हनी ट्रप’ लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअॅप, हाइक, वी चॅट अशा वेगवेगळ्या माध्यमांतून सावज हेरले जाते व अनेकदा प्रत्यक्ष न भेटता ऑनलाइन फसवणूक केली जाते किंवा त्याला जाळ्यात अडकवले जाते. आता प्रकरणातील आरोपी अर्चनाने खुलासा केला आहे की, मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. मी तोंड उघडले तर राज्यात गडबड होईल, असा कडक इशाराही तिने दिला आहे.
एका अधिकृत माहितीनुसार, १८ आमदार, ३ मंत्री, अनेक मोठे अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींना अर्चना नाग आणि तिच्या पतीने जाळ्यात ओढले. तसेच अर्चनाने पोलिसांवर देखील आरोप केला असून पोलिसांनी मला तीन दिवस पोलीस कोठडीत डांबून ठेवले असून माझा शारीरिक व मानसिक छळ केला आहे असेही तिने म्हटले आहे.
सुमारे सात वर्षांपूर्वी एका खेड्यातील अर्चना या तरूणीने काही काळ नोकरी केल्यानंतर जगबंधू या तरुणाची लग्न केले त्यानंतर दोघांनाही झटपट श्रीमंत होण्याचे वेड लागले होते. त्यातून त्यांनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणे सुरू केले. त्यातूनच हनी ट्रॅपिंगला सुरुवात झाली. बड्या नेत्यांना, प्रसिद्ध आणि श्रीमंत नागरिकांना जाळ्यात अडकवण्याचा खेळ दोघांनी सुरू केला. त्यासाठी अतिशय नियोजित पध्दतीने कट कारस्थाने रचली.
विशेष म्हणजे पती हा जगबंधु बड्या नेत्यांशी ओळख काढून स्वत:चा परिचय एका राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून करून द्यायचा. अर्चना स्वत:ची ओळख वकील सांगायची. दोघे त्यांच्या घरी बड्या असामींना जेवायला बोलवायचे. त्यानंतर गुंगीचे पदार्थ त्यांच्या जेवणात मिसळायचे. मग लपवलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने त्यांचे अश्लिल व्हिडीओ चित्रित करायचे. त्यांच्या मदतीने ब्लॅकमेलिंग आणि वसुली करायचे. तसेच ते गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन अनेकांकडून पैसे उकळायचे. राजकीय नेत्यांबरोबर चित्रपट क्षेत्रातील काही बडे हस्तींनाही अर्चनाने आपल्या जाळ्यात ओढले होते, या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
Orissa Politics Honey Trap ED Enquiry Crime