मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष अभ्यास करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी येथे दिल्या. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान बाबतच्या राज्य कार्य गटाची बैठक झाली. त्यावेळी श्री टोपे. यांनी सूचना दिल्या. मंत्रालयातील समिती कक्षात झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, संचालक डॉ साधना तायडे, उपस्थित होते.
सहाय्यक संचालक डॉ. अरुण यादव यांनी प्रथम राज्य कार्य गटाच्या बैठकीबाबत उद्देश सांगितला. राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. अवयवदान चळवळीस व्यापक स्वरूप देण्यासाठी याबाबत लोकांना माहिती, शिक्षण, संवाद या माध्यमातून जाणीव जागृती करण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. अवयवदानाबाबत मुंबईतील सायन आणि केईएम रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांचा अभ्यास करावा. वैद्यकीय शिक्षण विभागाने तज्ञ डॉक्टर यांच्याकडून हा अभ्यास करावा, असा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर आहेत. याचबरोबर नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूर येथे अशाप्रकारे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कार्यदलाचे सदस्य डॉ. एस.के. माथूर, डॉ. गुस्ताव दावर, डॉ. राहुल पंडित, डॉ. कपिल झिरपे, डॉ. सुजाता पटवर्धन, डॉ. मंगला गोमारे, डॉ. श्रीरंग बिच्चू, डॉ. संजय कोलते, डॉ. प्रवीण सुर्यवंशी, डॉ. सुजाता अष्टेकर उपस्थित होते.