इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भंडारा येथील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट होऊन ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृताचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ११ वाजता हा स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे परिसर हादरला. साबुदाणासारख्या कच्चा माला जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. या आवाजामुळे नागरीक भयभीत झाले व ते रस्त्यावरच थांबले. तर काही जण घराबाहेर आले. हा काऱखाना भंडारा शहराजवळ आहे.
या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून, सध्या बचावकार्य सुरू आहे. स्फोटामुळे छत कोसळले असून ते जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरू आहे. तेथे एकूण १२ लोक असल्याची माहिती आहे, त्यापैकी २ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी दिली.