नाशिक – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिकमधील कोरोनाच्या परिस्थितीची दखल घेऊन ते यासंदर्भातील आढावा घेणार आहोत. दोन्ही नेत्यांचा प्रथमच हा एकत्रित दौरा आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस हजारो बाधित होत आहेत. त्या तुलनेत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन आदींचा मोठा तुटवडा आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. नाशिकला जाणून बुजून रेमडेसिविर इंजेक्शन कमी दिले जात असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजप नेत्यांनी काल मुंबईत अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. याची दखल या दोन्ही नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळेच फडणवीस आणि दरेकर हे दोन्ही नेते आज दुपारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कोरोना उपचारांसंदर्भातील माहिती घेणार आहेत. त्यानंतर नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयात ते जाणार असून तेथे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमवेत कोराना आढावा बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.