विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या भेटीची माहिती खुद्द फडणवीस यांनीच दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली याबाबत सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, ही सदिच्छा भेट असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
मुंबईत आज मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन होते. त्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व वरिष्ठ नेते व मंत्री तेथे उपस्थित होते. त्याचवेळी फडणवीस यांनी पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे टायमिंग नक्की कसले आहे, यावरुनही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. मराठा आरक्षण, कोरोनाचे संकट, सध्या लागू असलेला लॉकडाऊन, लसीकरण असे अनेक प्रश्न सध्या राज्यात गाजत आहेत. यापार्श्वभीमूवर फडणवीस आणि पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप या भेटीबाबत कुठलीही माहिती जाहिर करण्यात आलेली नाही. त्यामुळे चर्चांचा हंगाम सध्या जोरात राहणार असल्याचे चित्र आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1399269562055479300