नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून येथे सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध बाबी स्पष्ट केल्या. याचवेळी त्यांनी सांगितले की, शिंदे-फडणवीस सरकारला आम्ही महाराष्ट्र हितासाठी रचनात्मक सहकार्य करणार आहेत. त्यासाठी त्यांनी पावसाळी अधिवेशनाचेही उदाहरण त्यांनी दिले.
अजित पवार म्हणाले की, नागपूरला दरवर्षी होणारे हिवाळी अधिवेशन कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे होऊ शकले नाही. जवळपास तीन वर्षांनंतर नागपूरला हिवाळी अधिवेशन होत आहे. उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तरमहाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्यांसह राज्यासमोरील प्रश्नांवर, विकासाच्या मुद्यांवर चर्चा व्हावी, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या अडचणी सोडवल्या जाव्यात, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासाला गती देणारे निर्णय अधिवेशनाच्या माध्यमातून व्हावेत, ही राज्यातील तेरा कोटी जनतेची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी राज्यसरकारला रचनात्मक सहकार्य करण्याची भूमिका विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेहमीच घेतली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाचा एका मिनिटाचा वेळही गोंधळामुळे वाया जाऊ नये, सर्व विधेयके चर्चेनंतरच मंजूर होतील, याची काळजी विरोधी पक्ष म्हणून आम्ही घेतली. उद्यापासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातही आमची तीच भूमिका, प्रयत्न असणार आहे. राज्याच्या विकासासाठी, नागरिकांच्या हितासाठी सरकारला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. परंतु, महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्या, महाराष्ट्राच्या भूमीचे लचके तोडणाऱ्या, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळणाऱ्या, महाराष्ट्राच्या हिताशी प्रतारणा करणारी कुठलीही व्यक्ती, वक्तव्य, निर्णय, कृतीला आमचा ठाम विरोध राहील. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचे कर्तव्यही आम्ही निश्चित पार पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले.
Opposition leader Ajit Pawar on Assembly Session
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते @AjitPawarSpeaks यांच्या शासकीय निवासस्थानी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात महाविकास आघाडी व मित्रपक्षांची आढावा बैठक पार पडली.#WINTERSESSION2022 #Maharashtra pic.twitter.com/11TYrnyqeM
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 18, 2022