नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी काळे कपडे घालून आज संसदेत निषेध नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन भाषण करावे ही मागणी विरोधकांनी आजही लावून धरली. यावेळी संसदेच्या परिसरात आंदोलन करुन प्रधानमंत्री सदन में आओ, मणिपुर पर जवाब दो अशी घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षानेही विरोधकांना चोख उत्तर दिले.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेचा अपमान करत आहेत. त्यांना राजस्थानमध्ये जाऊन भाषण करता येतं, पण, संसदेत येऊन बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही का ? असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षच आमचं तोंड बंद करण्यासाठी गोंधळ करत आहेत. यावर ते आम्हाला काही बोलूच देत नाही. याआधी सत्ताधारी पक्षाने कधीच असं केलं नव्हतं.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर सभागृहात निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल म्हणाले की, ज्यांचे तन आणि मन दोन्ही काळे आहे. त्यांच्या मनात दुसरं काय असणार? असा सवाल करत काळे कपडे घातल्याबद्दल विरोधकांवर टीका केली आहे.