इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ख्रिस्तोफर नोलनच्या चित्रपटांची चित्रपटप्रेमी फारच आतुरतेने वाट पहात असतात. भारतातही त्याच्या चित्रपटाची क्रेझ दिसते. त्याचा बहुचर्चित चित्रपट ‘ओपेनहायमर’ शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि लगेचच नेटिझन्स त्यावर बरसले.
खरं तर नोलन यांच्या चित्रपटाची चाहते फारच उत्सुकतेने वाट पहात असतात. त्यांचे वेगळे विषय आणि ते हाताळण्याची पद्धती यांमुळे चाहत्यांना या चित्रपटांची उत्सुकता असते. त्यामुळेच ‘ओपेनहायमर’ची चाहते वाट बघत होते. आता या सिनेमातील प्रत्येक दृश्याचे कौतुक होत असले, तरी एका दृश्याबाबत सोशल मीडियावर नाराजीचा सूर आहे. नोलन यांनी या सिनेमात भगवद्गीतेतील काही संदर्भांचाही समावेश केला आहे. जे. रॉबर्ट ओपेनहायमरला भागवद्गीतेबद्दल प्रचंड आकर्षण होते. या चित्रपटात ओपेनहायमरच्या भूमिकेत सिलियन मर्फी असून एका आक्षेपार्ह सीनमध्ये तो भगवद्गीता वाचताना दिसला आहे आणि त्यावरच प्रेक्षक चिडले आहेत. सिनेमातील एका सेक्स सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सिनेमातील या दृश्यावर टीका होतेच आहे, पण चित्रपटात हा सीन तसाच ठेवल्याबद्दल सेन्सॉर बोर्डावर टीका होते आहे.
मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ओपेनहायमर’मध्ये आधी एक न्यूड सीन होता. त्यानंतर या सीनमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. टॉपलेस अभिनेत्रीने हातात भगवद्गीता धरली असून सेक्स करत असताना अभिनेता मर्फी त्यातील श्लोकाचा अर्थ तिला सांगतो. या सीनमुळेच नेटकऱ्यांनी सिनेमावर आणि सेन्सॉर बोर्डावर ताशेरे ओढले आहेत. ‘या इंटिमेट सीनमध्ये भगवद्गीता दाखवणे आणि त्याचे पठण करण्याच्या सीनची गरज होती का?, असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. हा भाग सोडला तर ओपनहायमर हा उत्तम चित्रपट आहे. अशा दृश्यांना परवानगी देताना सेन्सॉर बोर्डाला काहीच कसे वाटले नाही?, असा प्रश्नही एकाने विचारला आहे. ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूडचा एक सामान्य वर्णद्वेषी आहे. त्याने WWI चित्रपटातील सर्व भारतीय लढवय्ये पूर्णपणे बंद केले आणि आता तो हिंदू धर्माचा संबंध लैंगिक संदर्भ जोडत आहे. पश्चिमेकडील पॉर्न विकृत लोक पुन्हा हिंदू ग्रंथांचा अनादर करत आहेत., असेही एकाचे म्हणणे आहे.
अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. ओपनहायमर यांनी हिंदू धर्मातील वेद आणि भगवद्गीतेचा प्रचंड अभ्यास केला होता, त्यासाठी ओपनहायमर संस्कृत शिकले होते. या चित्रपटाला पाहिल्याच दिवशी भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व स्तरातून याचं कौतुक होत आहे. आता मात्र या एका सीनमुळे निर्माण झालेला हा वाद वेळीच मिटणार की आणखी चिघळणार ते येत्या काही दिवसांत समोर येईल.