विशेष प्रतिनिधी, नाशिक
खासगी हॉस्पिटलच्या कारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या ऑपरेशन हॉस्पिटल या अभियानाचे जितेंद्र भावे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कॉलेजरोडवरील व्हिजन हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या उपचार बीलावरुन गोंधळ घातल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची खासगी हॉस्पिटलकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत भावे आणि त्यांच्या साथीदारांनी ऑपरेशन हॉस्पिटल ही मोहिम सुरू केली आहे. याच अंतर्गत व्हिजन हॉस्पिटलमध्ये अभियान राबविण्यात आल्याचे भावे यांनी म्हटले आहे तर याप्रकरणी हॉस्पिटलचे डॉ. विक्रांत विनोद विजन यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या २२ मे रोजी सकाळपासून सायंकाळ पर्यंत भावे आणि त्यांचे समर्थक यांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर या रुग्णाच्या उपचारासंदर्भातील कागदपत्रे आणि बिल भावे यांनी मागितले. तसेच, हॉस्पिटलमध्ये गोंंधळ घालून कारभारात अडथळा आणला. तसेच, भावे व समर्थकांनी हॉस्पिटलच्या स्टाफलाही धमकावले. त्यानंतर भावे, त्यांचे समर्थक व रुग्णाचे कुटुंबिय हे हॉस्पिटलचे बिल अदा न करताच निघून गेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी भावे यांच्यासह रुग्णाचा मुलगा स्वप्निल आठवणे, मुलगी सायली आठवणे (रा. दत्तनगर, पेठरोड), सोमा कुऱ्हाडे, रोहन देशपांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृती व मालमत्तेची हानी प्रतिबंधक अधिनियम २०१०चे कलम ४ नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, वोक्हार्ट हॉस्पिटल आणि मुंबई नाका पोलिस स्टेशन येथे जमाव जमविल्याप्रकरणी भावे व त्यांच्या समर्थकांवर कालच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.