विशेष प्रतिनिधी, मुंबई
मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या रुग्णांच्या लुटीबाबत नाशिकमध्ये आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे आणि ऑपरेशन हॉस्पिटल यांनी चालवलेल्या चळवळीला जनमानसातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. जितेंद्र भावे यांनी या लुटीच्या विरोधामध्ये आपले कपडे काढले आणि अक्षरशः महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था उघडी पडली. भावेंच्या गांधीगिरीचा व्हिडीओ तब्बल अडीच कोटीहून जास्त लोकांपर्यंत पोहोचला. त्याची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चा केली गेली, दखल घेतली गेली. याचेच परिणाम स्वरूप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्र्यांनी खाजगी हॉस्पिटलसाठी कोविड उपचाराकरिता नवीन दरपत्रक घोषित केले. हा जितेंद्र भावे यांच्या आंदोलनाचा, ऑपरेशन हॉस्पिटलच्या चळवळीचा आणि या आंदोलनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेने दिलेला प्रचंड मोठ्या पाठिंब्याचा विजय आहे, असे आपने म्हटले आहे.
आपचे सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, “हा निर्णय घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे आम आदमी पक्ष शतशः आभार मानत आहे. परंतु त्याच वेळी या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना खाजगी हॉस्पिटलच्या आत्तापर्यंत चाललेल्या मनमानी कारभाराला आळा घालण्यामध्ये आलेल्या अपयशाबद्दल आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत. *गेले एक वर्षभर मोठी कोविड हॉस्पिटले मोठ्या प्रमाणावर रुग्णांना रडवत आहेत. त्यांच्याकडून नियम डावलून खूप जास्त बिले वसूल करत आहेत. हे रोखण्याचं काम राज्याच्या आरोग्य विभागाचे आहे परंतु त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर अपयश आलं आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आहे”, अशी खरमरीत टीका आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे (मोबाईल नंबर – 9867693588) यांनी केली.
शिंदे म्हणाले की, जेव्हा राज्य सरकार, प्रशासकीय यंत्रणा रुग्णांची ही लूट थांबवण्यात अपयशी झाले तेव्हा आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडे लोकांनी धाव घ्यायला चालू केली आणि त्यातून ऑपरेशन हॉस्पिटल नावाची चळवळ जन सहभागातून नाशिक शहरामध्ये उभी राहिली. ही चळवळ आता आम आदमी पक्ष महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये नेणार आहे. लोकांची बेकायदेशीर पद्धतीने लूट करणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापन विरुद्धचा हा संघर्ष आता पेटला असून यामध्ये आम आदमी पक्ष सामान्य जनतेच्या आणि प्रामाणिक डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलेला आहे. ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा आमचा मनोदय आहे.
शिंदे यांनी सांगितले की, या चळवळीच्या दणक्यामुळे नाशिकमधील खाजगी हॉस्पिटल्स व्यवस्थापनामध्ये खळबळ माजली असून काहींनी कोविड उपचार करण्यास नकार देण्याची भूमिका घेतली होती असे समजते. या दबावतंत्राला बळी न पडण्याचा आग्रह आम आदमी पक्ष राज्य सरकारकडे धरत आहे. घोषित केलेले नवीन दर पत्रक नियमानुसार सर्व राज्यभर कठोरपणे राबवले जावे अशी मागणी आम आदमी पक्ष करत आहे.
एरवी प्रत्येक मुद्द्यावर राज्य सरकारवर टीकास्त्र करणारे, छोट्या-छोट्या मुद्द्यांवर लक्ष घालून बोलणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सर्व नेते हे मात्र या अशा मोठ्या बेकायदेशीर लुटारू हॉस्पिटल व्यवस्थापनाबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत. भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस आणि रुग्णांना लुटणारी मोठ्या रुग्णालयांची व्यवस्थापनाने यांच्यामध्ये नक्की संबंध काय आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. भारतीय जनता पक्ष हा लुटारू हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या बाजूने उभा आहे हे सर्वसामान्य जनतेला आता कळलेले आहे, असे शिंदे म्हणाले.
आरोग्य हा आम आदमी पक्षाच्या नेहमीच प्राथमिकतेचा मुद्दा राहिलेला आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या सरकारने आरोग्य क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे जनतेचा विश्वास संपादन करत सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा बहुमान मिळवलेला आहे. महाराष्ट्रातदेखील आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रोजगार, शेती, उद्योग यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर काम करत जनतेचा विश्वास संपादन करण्याचा मनोदय आम आदमी पक्ष व्यक्त करत आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.