नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रशिया युक्रेन युद्धात प्रचंड मोठी जीवित आणि वित्त हानी होत असून युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराची अनेक विमाने युक्रेन नजीकच्या देशात पोहोचलेल्या नागरिकांना घेऊन भारतात फेऱ्या मारत आहेत. यासाठी परदेशातच कंट्रोल रूम तयार करण्यात आली असून या कंट्रोल रूम मार्फतच परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या टीममध्ये दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यां प्रमाणेच अनेक सनदी अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी तसेच परदेशातील भारतीय युवक देखील सहभागी झाले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताच्या दूतावासाने ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत बुडापेस्ट, हंगेरी येथे एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. ‘ऑपरेशन गंगा’ यशस्वी करण्यासाठी एक टीम म्हणून ते काम करत असून भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी निर्वासन प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत.
भारतीय दूतावासाने बुडापेस्टमधील एका छोट्या हॉटेलच्या खोलीत नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यामध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या टीमसोबत तसेच शेकडो स्वयंसेवकांसह काम करणारे तरुण भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहे. संपूर्ण मोहीमेवर देखरेख ठेवण्यासाठी माजी राजदूत कुमार तुहीन, यांना विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून आणण्यात आले असून, यासह सुमारे 30 जणांची कोर टीम तयार करण्यात आली आहे. किमान सहा सदस्य कमांड सेंटरमधील या कोर टीमचा भाग आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे नेतृत्व करणाऱ्या 10-15 जणांच्या संघाशी समन्वय साधण्यासाठी आहेत. तसेच इस्रायलमधील भारतीय दूतावासाचे उपप्रमुख राजीव बोदवडे हे बुडापेस्टमध्ये विशेष कर्तव्यावर होते, त्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही जेव्हा या कामाला सुरुवात केली, तेव्हा काही विद्यार्थी होते. पण हळूहळू त्यांची संख्या वाढू लागली आणि त्यामुळे एक संघटित रचना झाली. आम्ही 150 हून अधिक स्वयंसेवक आणण्यात यशस्वी झालो, परंतु एकत्रित प्रयत्नांची गरज होती.
युक्रेनमध्ये घडणाऱ्या घटना आणि प्रयत्नांबद्दल बोलताना राजीव म्हणाले, आम्ही एक कमांड सेंटर स्थापन केले आहे. सीमेवरील आमची टीम किती नागरिकांनी सीमा ओलांडली आणि किती जण शहरात येणार आहेत हे सांगेल. त्यानंतर मग आम्ही कमांड सेंटरमध्ये गणना करतो. ही टिम चार प्रमुख विभागामध्ये विभागली गेली असून वाहतूक, निवास, अन्न आणि उड्डाणे यावर लक्ष देऊन समन्वय करते. त्यांना 150 हून अधिक स्वयंसेवक मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राजीव म्हणाले, पहिली टीम वाहतुकीची काळजी घेते, कारण नागरिक रेल्वे, रस्ते यासह विविध मार्गांचा वापर करत आहेत आणि काही जण पायी चालतही आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सीमेपलीकडे जाण्यासाठी व्यवस्था केली आहे, जिथे त्यांना तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली जाईल. दुसरी टीम निवास शोधण्यासाठी असून त्यांनी 40 पेक्षा जास्त ठिकाणे शोधून काढली आहेत जिथे आम्ही त्यांना सामावून घेऊ शकतो.
राजीव पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी दिवसातून तीन वेळा जेवणाची व्यवस्था करणे हेही मोठे आव्हान होते. गेल्या काही दिवसांत, आम्ही 2,000 हून अधिक जणांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. अनेक ठिकाणे बदलू शकतात, म्हणून आम्हाला जलद गतीने कार्य करावे लागेल आणि आमच्या तिसऱ्या म्हणजे फूड टीमसाठी ही एक मोठी जबाबदारी होती. विद्यार्थी भारतात उतरेपर्यंत काम संपत नाही, म्हणून विमानतळावर आधारित चौथ्या टिमची जबाबदारी आहे. विमानतळावरील आमची टीम आम्हाला सांगते की, विमानतळावर किती फ्लाइट आहेत आणि किती गणांना आणि कोणत्या वेळी पाठवले जाऊ शकते. राजीवप्रमाणेच, भारतातील सर्वात मोठ्या निर्वासन प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी भारतीय दूतावासाने शेजारील देशांतील इतर अनेक अधिकाऱ्यांना विशेष कर्तव्यावर येथे आणले आहे.