इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अन्य देशांच्या मार्गे प्रामुख्याने दुबई, युएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट ही मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत १११५ मेट्रिक टन माल वाहून नेणारे ३९ कंटेनर जप्त करण्यात आले. या मालाची किंमत अंदाजे ९ कोटी रुपये आहे. यामधून पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतुकीवर सरकारने लागू केलेल्या आयात धोरणाच्या अटी आणि निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे. आयात करणाऱ्या फर्मच्या भागीदारांपैकी एकाला २६ जून रोजी अटक करण्यात आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने २ मे पासून पाकिस्तानातून येणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा पारगमनावर व्यापक बंदी घातली होती. यापूर्वी अशा वस्तूंवर २०० टक्के सीमा शुल्क आकारले जात होते. या कडक उपाययोजना करूनही, काही आयातदार मालाच्या उत्पत्तीची चुकीची घोषणा करून आणि संबंधित शिपिंग कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारी धोरणाला डावलण्याचा प्रयत्न करतात.
दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, न्हावा शेवा बंदरावर हे सामान जप्त करण्यात आले. या मालाचे मूळ पाकिस्तान असल्याचे लपवून, ते संयुक्त अरब अमिरातीमधून आल्याचे खोटे घोषित करण्यात आले होते. तथापि, तपासात असे दिसून आले की हा माल प्रत्यक्षात पाकिस्तानातून आला होता, आणि तो केवळ दिशाभूल करण्यासाठी दुबई मार्गे भारतात पाठवला होता.
तपासात असे दिसून आले की सुरुवातीला हा माल एका कंटेनर आणि जहाजांवरून पाकिस्तानातून दुबईला नेण्यात आला आणि नंतर तो भारताकडे जाणाऱ्या दुसऱ्या कंटेनर आणि जहाजांवर हलवण्यात आला. मालाची अधिक तपासणी आणि आतापर्यंत केलेल्या तपासादरम्यान गोळा केलेल्या कागदपत्रांचे विश्लेषण केल्यावर या मालाच्या प्रवासाचा मार्ग उघडकीला आला आहे. हा माल पाकिस्तानच्या कराची बंदरातून निघाला आणि दुबईतील जबेल अली बंदरावर तो भारताकडे जाणाऱ्या जहाजांवर चढवण्यात आला. त्या शिवाय, पाकिस्तानी संस्थांबरोबर झालेले पैशांचे हस्तांतरण/ आर्थिक संबंध उघड झाले आहेत, ज्यामुळे अवैध आर्थिक व्यवहारांबाबत चिंता निर्माण झाली आहे. या संपूर्ण व्यवहाराची पद्धत पाकिस्तानी आणि युएईच्या नागरिकांबरोबरच्या गुंतागुंतीच्या व्यवहारांद्वारे आखली गेली, ज्याचा उद्देश मालाचे खरे मूळ, पाकिस्तान आहे, हे लपवण्याचे होते.
“ऑपरेशन सिंदूर” आणि सध्याच्या कडक सुरक्षा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमधून येणाऱ्या मालवाहतुकीला लक्ष्य करण्यासाठी डीआरआयने गुप्त माहिती गोळा करणे आणि डेटा विश्लेषण, याद्वारे आपली दक्षता वाढवली आहे. या सक्रिय देखरेखीमुळे मोठ्या किमतीचा माल जप्त झाला आहे.
सध्याच्या प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा विषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, “ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट” सरकारचे धोरण, सीमा शुल्क आणि इतर संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे, देशाच्या राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करणे आणि पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंच्या आयातीसाठी व्यापार माध्यमांचा गैरवापर रोखण्याप्रति डीआरआयची दृढ वचनबद्धता दर्शवते.
धोरणात्मक गुप्तचर यंत्रणा, लक्ष्यित अंमलबजावणी आणि आंतर-संस्था समन्वयाद्वारे, डीआरआय भारताच्या आर्थिक सीमा सुरक्षित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.