लडाख आणि गुरेझ खोऱ्यामध्ये संपर्क पुनर्स्थापित
नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बीआरओ म्हणजेच सीमा रस्ते संघटनेने १६ मार्च रोजी ‘ग्रेटर हिमालय रांगेवरील मोक्याची झोजिला खिंड खुली केली आहे. लडाख आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांमधले प्रवेशद्वार असणारी ११,६५० फूट उंचीवरची खिंड ६ जानेवारी पर्यंत वाहतुकीसाठी खुली होती. मात्र, त्यानंतर अतिशय प्रतिकूल हवामानामध्येही साचलेला बर्फ काढून तो मार्ग मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम घेण्यात आले. गेल्या वर्षी ७३ दिवस ही खिंड बंद होती. त्याच्या तुलनेत यावर्षी जोझिला खिंड मार्ग फक्त ६८ दिवस बंद होता. याआधीच्या वर्षांमध्ये तर ही खिंड १६०-१८० दिवस बंद असायची.
फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यापासून, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये अनुक्रमे प्रोजेक्ट बीकन आणि विजयक द्वारे खिंडीच्या दोन्ही बाजूंनी बर्फ साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले. सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर, झोजी ला खिंड ओलांडून संपर्क मार्ग सुरुवातीला ११ मार्च २०२३ रोजी स्थापित करण्यात आला. त्यानंतर, वाहनांसाठी सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी रस्त्याची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
अशाचप्रमाणे, गुरेझ क्षेत्र आणि काश्मीर खोऱ्यातील रस्ता जोडणारी एकमेव राझदान खिंडदेखील १६ मार्च २०२३ रोजी अवघ्या ५८ दिवसांच्या कालावधीनंतर यशस्वीपणे पुन्हा खुली करण्यात आली. यावेळी साधना, फर्कियां गली आणि जमीनदार गली येथील इतर महत्त्वाच्या खिंडी हिवाळ्यात खुल्या ठेवण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी बोलताना, सीमा रस्ते संघटनेचे डी. जी. लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी, यांनी ही कामगिरी केल्याबद्दल प्रोजेक्ट बीकन आणि प्रोजेक्ट विजयकच्या कर्मयोगींचे कौतुक केले. लेफ्टनंट जनरल चौधरी म्हणाले, “झोजिला आणि राझदान खिंडीतून लवकर ये-जा सुरू केल्यामुळे लडाख आणि गुरेझ खोऱ्यातील लोकांसाठी आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यात वाढ होईल.
सीमा रस्ते संघटनेचे डी. जी. पुढे म्हणाले की, वाहनांची चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली असून नागरी वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याचा निर्णय नागरी प्रशासनाकडून संयुक्त तपासणीनंतर घेतला जाईल.
https://twitter.com/BROindia/status/1636028806308962304?s=20